‘महासती मैना सुंदरी’ ही जैन धर्मावर आधारित मालिका १३ एप्रिलपासून पारस टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेचे शिर्षक गीत संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या रेकॉर्डिंग रूममध्ये स्वत: बप्पी लाहिरी आणि आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. या गाण्याचे बोल राजन लायलपुरी यांचे आहेत. आर. एस. पिक्चर्स निर्मित जैन धर्मावर आधारित या मालिकेद्वारे मानवाला प्रेम, त्याग, तपस्या आणि विश्वासचा मार्ग दाखविण्यात आला आहे. कर्म-प्रधान अशा या मालिकेत मनुष्याला चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ येथे भुतलावरच मिळत असल्याचा बोध या मालिकेद्वारे देण्यात आला आहे. मालिकेच्या निर्मात्यांना शुभेच्छा देत आशा भोसले म्हणाल्या, खूप मोठ्या काळानंतर मी धार्मिक प्रकारातील गाणे गायले आणि तेसुध्दा पहिल्यांदाच बप्पी लाहिरींबरोबर एका मालिकेसाठी हे गाणे गायले आहे.
योगायोगाने या मालिकेच्या शिर्षक गीताच्या रेकॉर्डींगच्या दिवशी संगीतकार बप्पी लाहिरी यांना पश्चिम बंगालच्या श्रीरामपुर येथून लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे निमंत्रण मिळाले. जे त्यांनी स्विकारले असून, कदाचीत हा ‘महासती मैना सुंदरी’चा प्रभाव असल्याचे मानले जात आहे.
या मालिकेचे निर्माता राकेश जैन असून, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन लखविंदर सिंह यांचे आहे, तर संवाद शिवराज गुजर आणि धर्मेन्द्र उपाध्याय यांचे आहेत. पंकज जैन आणि राकेश जैन हे या मालिकेचे सह-निर्माता आहेत.