नृत्याचे ‘अबकड’ पण ज्याला ठाऊक नाही अशा कलाकार, खेळाडूंना एकत्र आणून त्यांच्या नृत्यातील महारथी बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘झलक दिखला जा’च्या सातव्या पर्वाचा विजेता आशिष शर्मा बनला आहे. यावेळी आशिषला कारण टैकर, शक्ती मोहन, मौली रॉय यांना ‘कांटो की टक्कर’ द्यावी लागली आहे. पण ‘रंगरसैया’ मालिकेतून एका कडक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या आशिषने या सर्वांना टक्कर देत झलकची ट्रॉफी आपल्या खिश्यात टाकली आहे.
याबद्दल त्याच्याशी संपर्क साधला असता, सुरवातीला आपल्याला ट्रॉफी मिळाली असल्याबाबत अजूनही खात्री बसतं नसल्याचे त्याने सांगितले. ‘काही महिन्यांपूर्वी एक ‘नॉन डान्सर’ म्हणून मी या शोमध्ये भाग घेतला होता. आज या शोचा विजेता झालो आहे, हे माझ्यासाठी एका स्वप्नापेक्षा कामी नाही. मला नक्की काय बोलू हेच सुचत नाही आहे.’ पण तरीही झलकच्या प्रवासाने आपल्याला एका अभिनेत्यापासून ‘पफॉर्म’ बनवला असल्याचे त्याने सांगितले. त्याचंबरोबर, ‘या शोमुळे शिस्तबद्धता अंगात भिनली आहे. डान्सचा सराव करताना नियोजनबद्ध काम करायला मी शिकलो.’ 
आशिषसाठी हा प्रवास सोप्पा नव्हता. त्याची मालिका आणि डान्सचा सराव या दोहोंमध्ये ताळमेळ घालणे त्याला गरजेचे होते. ‘या शो दरम्यान माझी मालिका सुद्धा चालू होती. त्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळा सांभाळून, डान्सचा सराव करत असताना, मला दिवसातून जेमतेम ३-४ तसं झोप मिळायची. यामुळे मला ब्लड प्रेशरचा त्रास जाणवायला लागला होता.’ त्यामुळे आता मात्र काहीकाळ पूर्ण आराम करणार असल्याचे त्याने सांगितले.