अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातील ‘शिट्टी वाजली’ हे गाणे आता अवधूत गुप्ते यांच्या ‘एक तारा’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. एकच गाणे दोन वेगवेगळ्या चित्रपटांत सादर होण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. अवधूत गुप्ते आणि अभिजित पानसे यांच्या निखळ मैत्रीमुळे प्रेक्षकांसाठी हा योग जुळून आला आहे.
‘रेगे’मध्ये सादर झालेले ‘शिट्टी वाजली’ हे गीत पानसे यांनीच लिहिले होते. ‘रेगे’निर्मितीच्या वेळीच हे गाणे ‘एक तारा’मध्येही असेल, असे गुप्ते व पानसे यांनी ठरविले होते. एखाद्या गाण्यावर गीतकार, संगीतकार, गायक यांचा ‘स्वामित्व हक्क ’ असतो.
शक्यतो हा हक्क डावलला जात नाही. तसे झाले तर ते ‘स्वामित्व हक्क’ कायद्याचे उल्लंघन ठरते आणि मग न्यायालयीन कचाटय़ात तो चित्रपट, गाणे सापडते. येथे पानसे आणि गुप्ते यांची मैत्री असल्याने यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रेगे’ चित्रपटातील ‘शिट्टी’ आता पुन्हा अवधूत गुप्ते यांच्या ‘एक तारा’मध्ये वाजणार आहे. ‘शिट्टी वाजली’ हे गाणे अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात ‘एक तारा’मध्येही आहे. या चित्रपटाची कथा एका गायकाची आहे. गायक म्हणून स्वत:ला सिद्ध करणे आणि सिद्ध केल्यानंतर आपले अस्तित्व टिकविण्यासाठी करावी लागणारी कसरत या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. चित्रपटात संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.  

अभेद्य गुप्तेचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
‘एक तारा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अवधूत गुप्ते यांचा मुलगा अभेद्य याचे रुपेरी पडद्यावर पदार्पण होत आहे. नऊ वर्षांचा अभेद्य कांदिवली येथील गुंडेच्या एज्युकेशन अ‍ॅकॅडमीत शिकतो. चित्रपटात त्याने ‘ओमकार ज्ञानेश्वर लोखंडे’ या लहान मुलाची भूमिका साकारली आहे.