दलित आत्मकथनांचा एक अत्यंत जोमदार प्रवाह ७०-८० च्या दशकांमध्ये अवतरला आणि मराठी साहित्यात जणू भूकंपच झाला. गावकुसाबाहेरच्या दलित-शोषितांचं जगणं वरकरणी माहीत असलेल्या मराठी वाचकाला तो एक सामाजिक व सांस्कृतिक धक्काच होता. या धक्क्य़ानं मराठी समाजमानस पार हडबडलंच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागवलेली आत्मभानाची ज्योत हाती घेऊन अनेक दलित लेखक गवताला भाले फुटावेत तसे या काळात उदयास आले. त्यात दलित स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत. त्यांच्या वाटय़ाला तर जातवास्तवाबरोबरच बाईपणाचेही अधिकचे भोग आले होते. जो दलित पुरुषवर्ग स्पृश्यास्पृश्यतेच्या जातजाणिवांविरोधात बंड करून उठलेला होता, त्याला आपल्याच घरात आपणही एका ‘दलिता’वर- आपल्याच स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करतो आहोत याचं मात्र भान नव्हतं. त्यांना ही जाणीव करून देण्यासाठी मग दलित स्त्रियांनाही बंड करून उठावं लागलं. एकाच वेळी उच्चवर्णीयांबरोबरच घरातल्यांशीही त्यांना समतेच्या हक्कांसाठी अथक संघर्ष करावा लागला. ‘माणूस’ म्हणून घरात आणि घराबाहेर आपल्या हक्काचं स्थान मिळावं यासाठीचा त्यांचा हा लढा अतिशय खडतर व बिकट होता. परंतु त्या हिमतीनं तो लढल्या आणि बऱ्याचजणी त्यात यशस्वीही झाल्या. अशांपैकी एक लेखिका म्हणजे उर्मिला पवार. त्यांच्या ‘आयदान’ या आत्मकथनानं दलित स्त्रीचा हा दुहेरी संघर्ष ऐरणीवर आणला. त्यासाठी घरीदारी खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. परंतु आत्मभानाची आणि तत्त्वांची ही लढाई लढताना त्यांनी ती मोजली. ‘आयदान’मध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अथक लढय़ाचा हा लेखाजोखा कुठल्याही कटुतेशिवाय, काहीशा तटस्थतेनं, परंतु मिश्कील शैलीत मांडलेला आहे. हे लेखन जरी आत्मकथनात्मक असलं, तरी त्यांनी स्वत:कडेही काहीसं अलिप्तपणे पाहिलं आहे. आपल्या कृती आणि वर्तनाचीही झाडाझडती त्यांनी घेतली आहे. किंबहुना, ‘माणूस’पणापर्यंतचा आपला हा प्रवास त्यांनी अतिशय सजगतेनं व प्रगल्भपणे केलेला आहे. त्यामुळेच ‘आयदान’ हे मराठीतील एक महत्त्वाचं आत्मकथन ठरतं. बहुतांशी दलित आत्मकथनांमध्ये दिसणारा आक्रोश, आवेग आणि आक्रस्ताळेपणा यांचा या आत्मकथनात लवलेशही आढळत नाही. कदाचित त्या एक ‘स्त्री’ असल्यानं हा फरक पडला असावा. घटना-प्रसंगांकडे पाहण्याची सम्यक दृष्टी त्यांच्या लेखनात प्रकर्षांनं जाणवते.
उर्मिला पवार यांच्या या आत्मकथनाचं नाटय़रूप ‘आविष्कार’ व ‘अंजोर’ या संस्थांनी नुकतंच सादर केलं आहे. सुषमा देशपांडे यांनी त्याची रंगावृत्ती तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचंच आहे. गेल्या काही वर्षांत सुषमा देशपांडे यांनी स्त्रीजाणिवांची नाटकं एकापाठोपाठ रंगभूमीवर आणली आहेत. स्त्रीमुक्तीशी नातं सांगणाऱ्या या नाटकांतून ‘नाटक’ हरवणार नाही याची दक्षता त्या कायम घेत असतात. याही नाटकात त्यांनी स्त्रीच्या वाटय़ाला येणारे अटळ भोग- त्यातही दलित स्त्रीच्या वाटय़ाला येणारे दुहेरी शोषण व उपेक्षा त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी उर्मिलाताईंचा ‘माणूस’ म्हणून परिपक्व होण्याचा प्रवासही त्यांनी जाणीवपूर्वक प्रयोगात केन्द्रस्थानी राहील याची खबरदारी घेतली आहे. त्याकरताच बहुधा ‘आयदान’ची रंगावृत्ती तयार करताना त्यांनी त्यातले काही घटना-प्रसंग बुद्धय़ाच वगळल्याचं लक्षात येतं.  कोकणातल्या रत्नागिरीतील एका दुर्गम आडगावातलं उर्मिला पवारांचं कुटुंब. घरात अठराविश्वे दारिद्य््रा. असं असलं तरी त्यांचे वडील सुधारणावादी होते. मुलांनी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे- या विचारांचे! बाकी पुरुष म्हणून त्यावेळच्या इतर पुरुषांसारखेच. प्रचंड तापट. आई अशिक्षित, अडाणी; परंतु आयुष्याच्या शाळेत तिचं प्रशिक्षण झालं असल्यानं साहजिकच तिच्यापाशी व्यावहारिक शहाणपणाचं मायंदाळ संचित. प्रचंड कष्टांखेरीज आपल्याला पर्याय नाही, हे तिला पक्कं ठाऊक. म्हणूनच ‘आयदान’ (बांबूच्या टोपल्या, हारे, रोवळ्या वगैरे) बनविण्याचा तिचा उद्योग अखंड सुरू असतो. तरीही कुटुंबाची हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील. तशात चार मुलं पदरी. अशा कुटुंबातल्या मुलांचं जे होतं, तेच उर्मिलाच्याही वाटय़ाला येतं. आपण दलित असल्याची जाणीव आजूबाजूचं जग पदोपदी करून देत असल्याबद्दलची चीड असते. त्यातूनच उर्मिला ‘घडत’ जाते. थोडंफार शिकलेल्या मोठय़ा बहिणीमुळे तिच्या मनात शिकण्याबद्दलची आस निर्माण होते.. आणि उर्मिलाचं आयुष्य मार्गी लागतं. दरम्यान, डॉ. आंबेडकरांनी केलेल्या धर्मातराच्या आवाहनानं समस्त दलितांचं जगणंच बदलतं. त्यांच्यात एक नवी जाणीव जन्म घेते. उर्मिलालाही या घटनेनं नवी जाग येते.  अर्थात तरीही जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जातवास्तव फणा काढून तिला दंश करतच राहतं. त्यातून ती अधिक कणखर बनत जाते. हरिश्चंद्रच्या रूपात तिच्या शिकण्याच्या इच्छेला खतपाणी घालणारा जोडीदार मिळतो. नोकरीने आर्थिक स्वावलंबनाबरोबरच आत्मभानही येत जातं. नव्या ओळखी, शिक्षणाने दिलेला आत्मविश्वास, त्यातून लेखणीकडे वळणं.. हा सगळा प्रवास मग आपसूकच घडत जातो. तिच्या या विकासाने दुसरीकडे नवऱ्याची पुरुषी वृत्ती फणा काढून उभी राहते. बायको आपल्या पुढं गेली, याचा सल उभयतांत तिढा निर्माण करतो. त्यांच्यातल्या दुराव्याची सुरुवात होते.  विविध आघाडय़ांवर त्या एकाकी चिवटपणे झुंजत राहतात. नंतरच्या काळात पुत्रवियोगाच्या दु:खातून सावरण्यासाठी त्या पुन्हा लेखणी जवळ करतात.  नवऱ्याच्या निधनाने त्यांना आयुष्याचा फिरून विचार करायला भाग पाडतं. तत्त्वांची कसोटी पाहणाऱ्या अशा प्रत्येक प्रसंगांतून त्यांचं निखळ माणूसपण झळाळून उठतं..
सुषमा देशपांडे यांनी उर्मिला पवारांचा हा जीवनालेख तीन स्त्री-पात्रांकरवी सादर केला आहे. ‘आयदान’ची रंगावृत्ती तयार करताना त्यांनी काही ठिकाणी वापरलेले प्रमाणभाषेतले पुस्तकी शब्द मात्र खटकतात. प्रयोगाच्या ओघात ते रसभंग करतात. हा दोष वगळता प्रयोगात नाव ठेवायला जागा नाही. निवेदन, कथन, प्रसंग सादरीकरण अशा तिहेरी गोफात दिग्दर्शिकेनं प्रयोग बांधला आहे. हे तसं अवघडच. परंतु त्यांनी ही तारेवरची कसरत इतक्या सफाईनं जमविली आहे, की आपणही त्यात कळत-नकळत गुंतत जातो. उर्मिलाचं जगणं आपल्यासमोर साक्षात समूर्त होत जातं. उर्मिलाच्या आयुष्यात आलेली असंख्य माणसं, त्यांचे स्वभावविभाव, त्यांचं व्यक्त होणं, त्यांच्या लकबी, त्यांचं वागणं-वावरणं.. हे सारं तीन स्त्री-कलावंतांद्वारे सुषमा देशपांडे यांनी प्रत्ययकारकरीत्या उभं केलं आहे. कुणी एकच कलावंत उर्मिला म्हणून सादर न करता तिघीही आलटून पालटून उर्मिलाच्या भूमिकेत शिरतात आणि पाहणाऱ्यांनाही ते बिलकूल खटकत नाही, हे दिग्दर्शिकेचं मोठं यश होय. हा ‘प्रयोग’ निश्चितच दाद देण्याजोगा. निरंजन रुद्रपाल यांनी केलेलं ‘आयदान’चं नेपथ्य सूचक आहेच; परंतु अत्यंत अन्वर्थकही आहे. रवी-रसिक यांनी प्रकाशयोजनेद्वारे नाटय़ांतर्गत मूड्स, घटना-प्रसंगांतील ताणतणाव टोकदार केले आहेत. नितीन कायरकर यांनी पाश्र्वसंगीताचा संयमित वापर करत प्रयोगातल्या आशयाला अधिक उठाव दिला आहे.  तिन्ही कलाकारांनी झोकून देऊन साकारलेलं उर्मिलाचं भावविश्व अप्रतिमच! एकाच वेळी निरनिराळ्या भूमिकांत शिरण्याचं अवघड आव्हान त्यांच्यासमोर होतं. परंतु त्यांनी ते लीलया पेललं आहे. विशेषत: उर्मिलाताईंचा मुलगा गेल्यानंतरचा नंदिता धुरी यांचा आकांत हृदय पिळवटून टाकतो. त्यांच्या मोकळ्याढाकळ्या अभिनयामुळे उर्मिलाच्या जगण्याचं ओझं थोडंसं हलकंही होतं. शिल्पा साने यांनी उर्मिलाचा खोडकरपणा, मिश्कील वृत्ती, मनोमनी केलेली बंडखोरी संवादांतील आरोह-अवरोहांतून नेमकेपणानं दाखविली आहे. उर्मिलाची मालवणी सासूही त्यांनी ठसक्यात साकारलीय. शुभांगी सावरकरांनी उर्मिलाची जाऊ, भावोजी, थोरली बहीण, भाऊ, नवरा हरिश्चंद्र अशा व्यक्तिरेखा हुबेहुब वठविल्या आहेत. तिघींनीही परस्परांशी सुयोग्य ताळमेळ साधत या प्रयोगाची गती आणि शैली उत्तमरीत्या आत्मसात केली आहे. त्यामुळे नाटकातील पात्रांसंबंधात कुठंही गडबड-गोंधळ होत नाही. ही सगळी कसरत तिघीही जणी सर्कशीतल्या युवतींप्रमाणे सफाईनं करतात. उर्मिलाचं जगणं रंगमंचावर आकारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे यात तीळमात्र शंका नाही.                                      

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा