‘ए वेन्सडे’ या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षक सर्वामध्ये लोकप्रिय झालेले दिग्दर्शक नीरज पांडे यांचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद या विषयावरील ‘बेबी’ हा आणखी एक चित्रपट आहे. कथा-पटकथा-संवाद- दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी चोखपणे सांभाळत आणि समतोल राखत नीरज पांडे यांनी या नव्या चित्रपटाद्वारे rv06आपली मोहोर पुन्हा एकदा ठसठशीत उमटवली असून तब्बल १६० मिनिटांच्या लांबीचा चित्रपट असूनही प्रेक्षकाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट बनवला आहे. हा एक अप्रतिम िहमतबाज थरारपट दिग्दर्शकाने सादर केला आहे.
दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ आणि त्याचा बीमोड करण्यासाठी स्पेशल टीमचे प्रयत्न, त्यांचीही काम करण्याची पद्धत या गोष्टी सिनेमाच्या चौकटीत बसविण्याचा वास्तववादी प्रयत्न करणारी दिग्दर्शकीय शैली दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मांडली आहे.
चित्रपटाचे नाव जरी बेबी असे असले तरी दहशतवाद्यांचा बीमोड हा या चित्रपटाचा विषय प्रेक्षकांना माहीत असल्यामुळे चित्रपटाच्या नावाविषयी कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. बेबी हे नाव का, या प्रश्नाचे उत्तर लेखकाने सुरुवातीच्या कथनातच दिले आहे. कथानक सरळसोट आहे. मौलाना मोहम्मद रहमान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी बिलाल खान या अतिरेक्याच्या मदतीने भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्याच्या बेतात असताना याची खबर अजयसिंग राजपूत आणि फिरोझ अली खान यांच्या स्पेशल टीमला मिळते आणि या दोघांना नेस्तनाबूत करण्यासाठी ते एक गुप्त योजना आखून त्यानुसार दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावतात.
दहशतवादी आणि अतिरेक्यांचा बीमोड करून कारवाया रोखणारी भारतीय स्पेशल टीम यांची काम करण्याची पद्धत दाखविण्यावर लेखक-दिग्दर्शकाने भर दिला आहे. त्यामुळे एक प्रकारे नायक आणि खलनायक यांच्या कारवाया-प्रतिकारवाया दाखविणारे सर्वच प्रसंग अतिशय वेगवान पद्धतीने पडद्यावर साकारतात.
थंड डोक्याने कारवाई करणाऱ्या बिलाल खानच्या भूमिकेतील के के मेनन, आपल्या चपळाईने आणि चतुराईने कृती करणारा स्पेशल टीमचा अजयसिंह राजपूत या भूमिकेतील नायक अक्षय कुमार, त्याला तांत्रिक तज्ज्ञ म्हणून मदत करणारा घाबरट साहाय्यक शुक्लाच्या भूमिकेतील अनुपम खेर, आडदांड अधिकारी जयच्या भूमिकेतील राणा दग्गूबाती आणि या सर्वाचा बॉस म्हणून फिरोझ खानच्या भूमिकेतील डॅनी डेन्झोग्पा अशी कलावंतांची अचूक निवड हेच दिग्दर्शकाचे खरे सामथ्र्य ठरते.
प्रत्येक दृश्यांमध्ये जबरदस्त उत्कंठा लागून राहील अशी खेळी नायक आणि त्याचा चमू करीत जातो आणि नायकाच्या चतुर हिंमतबाजीवर दिग्दर्शकाने एकामागून एक खिळवून ठेवणाऱ्या थरारपटाची उभारणी केली
आहे. तापसी पन्नू या अभिनेत्रीने अक्षय कुमारची साहाय्यक म्हणून परदेशात एका खलनायकाशी केलेली मारामारी यातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकामागून एक ‘मिशन’ यशस्वी करताना एका घटनेत स्पेशल टीमला हार खावी लागते, असेही दिग्दर्शकाने दाखविले आहे. त्याचबरोबर संरक्षणमंत्र्यांशी केलेल्या संवादात फिरोझ अली खान आपल्याकडील व्यवस्थेवर अस्फुटपणे भाष्य करतो यातून दिग्दर्शकानेही भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी ‘मोडस ऑपरेंडी’वर भर देण्याचा दिग्दर्शकाच्या प्रयत्नामुळे चित्रपट यशस्वी ठरला आहे.

बेबी
निर्माते – भूषण कुमार, क्रिशन कुमार, शीतल भाटिया, केप ऑफ गुड फिल्म्स, क्राऊचिंग टायगर
लेखक – दिग्दर्शक – नीरज पांडे
छायालेखक – सुदीप चटर्जी
संकलक – श्री नारायण सिंग
संगीत – मीट ब्रॉस अंजान, एम. एम. करीम
कलावंत – अक्षय कुमार, राणा दग्गूबाती, तापसी पन्नू, अनुपम खेर, के के मेनन, डॅनी डेन्झोग्पा, मधुरिमा तुली, रशीद नाझ, मिक्काल झुल्फिकार, सुशांत सिंग, करण वाही.