‘ओह माय गॉड’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दिग्दर्शक उमेश शुक्ला कोणता चित्रपट करणार, याबद्दलची उत्सूकता चित्रपटप्रेमींमध्येही आहे. २०१२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज तिसरं वर्ष सरता सरता चक्क दोन चित्रपटांमध्ये दिग्दर्शक रमला आहे आणि दोन्ही चित्रपटांमध्ये ‘बच्चन’ नायक आहेत. उमेश शुक्लांच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात अभिषेक बच्चन नायकाच्या भूमिकेत आहे तर ‘१०२ नॉट आऊट’ याही चित्रपटाती तयारी उमेश शुक्ला यांनी सुरू केली असून अमिताभ बच्चन या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
‘ओह माय गॉड’ चित्रपटानंतर ऑफर्स खूप आल्या पण, त्या सगळ्याच चित्रपटांचे विषय हे ‘ओएमजी’शी मिळतेजुळते असल्याने ते करण्यात काही रस नव्हता, असे उमेश शुक्ला यांनी स्पष्ट केले. त्याचदरम्यान, ‘ऑल इज वेल’च्या पटकथेचे काम सुरू झाले. नव्या युगाचा श्रावणबाळ अशी या चित्रपटाची जाहिरात करण्यात आली आहे. पण, कुठेतरी श्रावणबाळाच्या पुराणकथेचा आधार घेऊन चित्रपटाची कथा आधुनिक समाजावर बेतली असावी, असा तर्कच काढणं आपल्या हातात आहे. कारण, या चित्रपटाचे तपशील आपल्याकडून बाहेर पडणार नाही, याची काळजी आपण घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अर्थात, या चित्रपटातील कलाकार हाही औत्सूक्याचा विषय आहे. अभिषेक बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी या चित्रपटात पुन्हा एकत्र येणार आहे. याआधी ‘दिल्ली ६’मध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. ‘ऑल इज वेल’मध्ये ते पिता-पुत्राच्या भूमिकेत आहेत.
‘ऑल इज वेल’साठी अभिषेक बच्चन हे नाव पहिल्यापासूनच निश्चित होतं. त्यानेही कथा ऐकल्यानंतर पहिल्याच फटक्यात होकार दिला. खरी काळजी होती ती ऋषी कपूर यांची. पण, अभिषेकच्या वडिलांच्या भूमिकेसाठी फक्त ऋषी कपूरच हवे होते. त्यांचा ‘दो दुनी चार’ हा चित्रपट पाहिल्यानंतर एक सामान्य माणसाच्या भूमिकेत ऋषी कपूर यांना आजपर्यंत कोणीही वाव दिलेला नाही, याची जाणीव झाल्याचे उमेश शुक्ला यांनी सांगितले. मुळात, ऋषी कपूर यांनाही कथा आवडली आणि ‘ऑल इज वेल’ची चांगली सुरूवात झाली. पण, गाडी रखडली ती स्मृती इराणींमुळे. ऋषी कपूर यांच्या पत्नीच्या भूमिकेत स्मृती इराणी होत्या पण, काही कारणांमुळे त्यांना चित्रपट अर्धवट सोडावा लागला. त्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. मात्र, चित्रिकरणाचा त्यांचा बराचसा भाग सुप्रिया पाठक यांच्याबरोबर नव्याने चित्रित करावा लागल्याने बराच वेळ गेल्याची माहिती उमेशने दिली.
‘ऑल इज वेल’ या चित्रपटातूनही सामाजिक भाष्य असेल. चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्यातून दिग्दर्शकाला काही एक लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. आणि माझ्या चित्रपटातून कायम हाच प्रयत्न राहिल, असं सांगणाऱ्या उमेशचा पाठोपाठ येणारा दुसरा चित्रपटही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि परेश रावल ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. १०२ वर्षांचा वयोवृध्द, जी भूमिका अमिताभ रंगवणार आहेत आणि त्यांचा ७५ वर्षांचा मुलगा, ज्यांची भूमिका परेश रावल यांनी केली आहे. या दोघांच्या नातेसंबंधांची रंजक कथा ‘१०२ नॉट आऊट’मध्ये मांडणार असल्याचे उमेशचे म्हणणे आहे. याआधीही आर. बाल्कीच्या ‘चिनी कम’ चित्रपटात अमिताभ यांनी परेश रावल यांच्यापेक्षा वयाने मोठय़ा असलेल्या ‘बुध्दा’ची भूूमिका साकारली होती. मात्र, आपल्या चित्रपटात वडील-मुलाच्या नात्यात या दोघांची वेगळी जुगलबंदी पहायला मिळेल, असा विश्वास उमेश शुक्ला यांनी व्यक्त केला.