एस. एस. राजामौली नामक दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या ‘बाहुबली’ नामक चित्रपटाची जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुरू असलेली घोडदौड आणि सलमान खान-कबीर खान जोडीच्या ‘बजरंगी भाईजान’ला दुसऱ्या आठवडय़ातही मिळालेल्या भव्य प्रतिसादामुळे केवळ २५ दिवसांच्या आत चित्रपटसृष्टीत ७९२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. २४ दिवसांत तिकीटबारीवर ५०० कोटी रुपये कमावत ‘बाहुबली’ या प्रादेशिक चित्रपटाने नवा विक्रम केला आहे तर ‘बजरंगी भाईजान’नेही २९२ कोटींचा पल्ला गाठला असून लवकरच हाही चित्रपट ३०० कोटींपर्यंत पोहोचेल, असा विश्वास ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
२०१३-१४ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आर्थिकदृष्टय़ा फारसे चांगले नव्हते. ‘फिक्की’च्या अहवालानुसार हिंदी चित्रपटसृष्टीच्या आर्थिक उत्पन्नात एका टक्क्यानेही वाढ झाली नव्हती. २०१५ ची सुरुवातही हिंदीसाठी तितकी लाभदायक ठरलेली नाही. अनेक बिग बजेट चित्रपटांनी पहिल्या सहा महिन्यांतच तिकीटबारीवर माना टाकल्यामुळे हेही वर्ष हिंदीसाठी आर्थिक दुष्काळाचेच ठरतेय की काय, अशी परिस्थिती होती. मात्र राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या बहुभाषिक चित्रपटाच्या वितरणाचे हक्क प्रसिद्धी दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यांनी घेतले. आणि हिंदी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने यावर्षीचा सुपरहिट चित्रपट मिळाला. मात्र, दहा भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ने दक्षिणेसह सातासमुद्रापार तिकीटबारीवर चांगलाच डंका वाजवला. केवळ २४ दिवसांत या चित्रपटाने ५०० कोटी रुपयांची कमाई करत नवा विक्रम केला आहे. गेल्या वर्षी आलेल्या ‘पीके’ने देशभरात ३३७ कोटींची कमाई करत सर्वाधिक कमावणारा चित्रपट असा विक्रम केला होता. मात्र, ‘पीके’चा प्रदर्शन काळ आणि त्याची कमाई या दोन्ही समीकरणांना मागे टाकत सर्वाधिक कमाई करणारा पहिला प्रादेशिक चित्रपट असा लौकिक ‘बाहुबली’ने मिळवला आहे. सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला बिग बजेट चित्रपट चांगली कमाई करणार, अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षेला पुरेपूर खरे उतरत या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून १६ दिवसांत २९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ३०० कोटींपर्यंत पोहोचेल, असे ट्रेम्ड विश्लेषकांनी म्हटले आहे. तरण आदर्श यांच्या मते ‘बजरंगी भाईजान’ हा सर्वात हिट चित्रपट ठरेल. तसे झाले तर बॉलीवूडला थोडा मोकळा श्वास घेता येईल. गेल्या सहा महिन्यांत केवळ एक चित्रपट दीडशे कोटी रुपयांच्या वर, एक चित्रपट शंभर कोटींच्या वर आणि मोजून ५ चित्रपट ५० कोटींच्या वर असा ताळेबंद असलेल्या इंडस्ट्रीसाठी एका महिन्यात ३०० कोटींची उडी खचितच आनंद देणारी ठरणार आहे. एकूणच बॉलीवूडला हॉलीवूडपटांची आणि प्रादेशिकपटांची स्पर्धा जाणवत असली तरी भारतीय चित्रपट उद्योगाच्या दृष्टीने या दोन्ही चित्रपटांनी महिन्याभरात केलेली ७९२ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आनंददायी ठरली आहे.