बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्या आगामी ‘बजरंगी भाईजान’या चित्रपटातील कथेचा आपल्या वैयक्तीक आयुष्याशी काहीही संबंध नसल्याचे करिना कपूरने म्हटले आहे.
चित्रपटाची कथा ब्राम्हण मुलगी आणि मुस्लिम मुलगा यांच्यावर आधारीत असल्याची माहिती समोर येताच याचा करिनाच्या वैयक्तीक आयुष्याशी संबंध असल्याची अटकळ बॉलीवूडमध्ये बांधली जात होती परंतु, या कथेचा वैयक्तीकरित्या तिळमात्रही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण करिनाने दिले आहे.
ती म्हणाली की, “पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित होणार आहे. एका मुस्लिम मुलाची आणि ब्राम्हण मुलीची ही कथा आहे. याचा माझ्या वैयक्तीक आयुष्याशी काहीही संबंध नाही पण, ही एक सुंदर भावनीक कथा आहे.” तसेच हा चित्रपट सलमानसाठी त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल असा विश्वासही करिनाने यावेळी व्यक्त केला. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची निर्मिती खुद्द सलमान खान करणार आहे त्यामुळे खान परिवारासोबत चित्रपट करता येणार असल्याचा आनंद असल्याचेही करिना म्हणाली.