नव्या वर्षांत प्रदर्शित झालेल्या पहिल्याच मराठी चित्रपटाने, ‘बालक-पालक’ने, आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रसिद्धी आणि गल्ला जमवला आहे. आता हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशभरात प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे, असे चित्रपटाचा सहनिर्माता असलेल्या रितेश देशमुखने ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे आता संपूर्ण देशभर मराठी चित्रपटांची ‘ढिंच्यॅक ढिंच्यॅक’ होणार आहे. हे यश सर्वस्वी आमच्या चित्रपटाच्या आशयाचे आहे, असे रितेशने कबूल केले. गेल्या पाच दिवसांत या चित्रपटाने दीड कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवल्याची माहितीही रितेशने दिली.
‘बालक-पालक’ या चित्रपटाचा आशय खूप सशक्त आहे. त्यात रवी जाधवचे दिग्दर्शन, विशाल-शेखर यांचे संगीत, चिनार-महेशचे पाश्र्वसंगीत, सर्व लहान मुलांचे अभिनय, महेश लिमये यांचे छायालेखन या सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आहेत. त्यामुळेच आम्हाला यशाची चव चाखायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटांनी ‘हाउसफुल्ल’चा बोर्ड बघितला.
या चित्रपटाला अनेक अमराठी लोकांनीही पसंती दर्शवली आहे. आम्ही सबटायटल्ससह चित्रपट प्रदर्शित केल्याने कोणालाही तो पाहताना अडचण आली नाही. त्यामुळे आता पुढील पायरी म्हणून आम्ही हा चित्रपट संपूर्ण देशभरात घेऊन जाणार आहोत. बेंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली, गोवा, बडोदा अशा अनेक शहरांतून चित्रपटाच्या खेळांसाठी मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही आता हा मराठी चित्रपट सबटायटल्ससह देशभरात प्रदर्शित करणार आहोत, असे रितेशने सांगितले.