‘बिग बॉस’च्या ‘ग्रॅण्ड फिनाले’ला फक्त सहाच दिवस शिल्लक असताना गौहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषा या अंतिम स्पर्धकांमधील तणाव आणि धास्ती वाढली आहे. खेळातील उत्तेजना आणि उत्सुकता वाढविण्यासाठी ‘बिग बॉस’ने एक रहस्यमय सुटकेस घरात पाठवून स्पर्धकांचा प्रमाणिकपणा तपासण्याचे ठरवले आहे. संध्याकाळी घरातील सदस्यांना लिव्हिंग रूममध्ये  एकत्र बोलावले जाते, ज्या ठिकाणी टेबलावर साखळीने बांधून ठेवलेली एक सुटकेस ठेवण्यात आली आहे. सुटकेसमध्ये काय आहे याचा खुलासा न करता, सदर सुटकेस कोण्या एका स्पर्धकाला मिळण्यासाठी ‘बिग बॉस’ पाचही स्पर्धकांना सर्वमताने एकाचे नाव ठरविण्यास सांगतो. सुटकेसमध्ये काय असेल याची खात्री नसल्याने पहिली पाच मिनिटे घरातील सदस्य निव्वळ त्या सुटकेसकडे पाहात राहातात. या नंतर सुरू होतो तर्क-वितर्कांचा खेळ. सुटकेसमध्ये स्पर्धेतून बाहेर पडण्याचे तिकीट असण्याची शक्याता वर्तविण्यापासून, अनेक अंदाज बांधले जातात. अंदाज बांधण्याचा खेळ सुरू असताना, सुटकेसमध्ये पैसे असल्याची शक्याता वर्तवत एजाझ ती सुटकेस घेण्याचे ठरवतो. परंतु, घरातील सदस्य त्याच्याशी सहमत होत नाहीत. यानंतर घरातील प्रत्येक सदस्य सुटकेस घेण्यासाठी पुढे जातो, पण त्याचवेळी अन्य सदस्य त्याला मागे ओढतात. या रहस्यमय सुटकेसमध्ये काय असेल? शेवटी घरातील कोणता सदस्य ही सुटकेस ताब्यात घेईल? हे पाहाणे रंजक ठरेल.