‘बिग गॉस’च्या घरातून मिनिषा लांबाच्या आश्चर्यकारकरित्या बाहेर पडण्याबरोबर पुनित इस्सारचे घरात पुनरागमन झाले. ‘नच बलिये’च्या तालावर ‘बिग बॉस’च्या घरातील नव्या दिवसाची सुरुवात होताच, घरातील पुढील नामांकनाची प्रक्रियेलादेखील सुरू होते. कर्णधार उपेन पटेल सुरुवातीला पाच नावांची निवड करतो. उपेनने निवडलेल्या नावामधून घरातील अन्य सदस्य एके-एके करून कन्फेशन रूममध्ये जाऊन प्रत्येकी दोन नावांची निवड करतात. घरातील सदस्यांसाठी हा भावनात्मक क्षण असतो. यानंतर घरातील सदस्यांसाठी ‘बिग बॉस’तर्फे देण्यात येणाऱ्या कार्याची वेळ होते. यावेळच्या कार्यादरम्यान ‘बिग बॉस’ करिश्मा तन्ना आणि गौतम गुलाटीला कन्फेशन रूममध्ये बोलावतो. कन्फेशन रूममध्ये हे दोघे त्यांना दिलेले कार्य करत असताना घरातील इतर सदस्यांना ते पाहाण्याची संघी ‘बिग बॉस’तर्फे पुरविण्यात येते. ‘बिग बॉस’तर्फे दोघांना काही प्रश्न विचारण्यात येतात, ज्याचे ‘होय’ अथवा ‘नाही’ असे उत्तर करिश्मा आणि गौतमला द्यायचे असते. एखाद्या प्रश्नावर दोघांचे ‘होय’ असे एक मत झाल्यास त्याचा फायदा घरातील संबंधीत सदस्याला होणार असतो.
करिश्माचा मेकअप बॉक्स परत करण्याबाबतच्या प्रश्नाला करिश्मा होकारार्थी, तर गौतम नकारार्थी उत्तर देतो. हा सर्व प्रकार घरातील अन्य सदस्य टीव्हीच्या माध्यमातून पाहात असतात. परंतु या नंतर जे काही होते ते घरातील सर्वांना थक्क करणारे असते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना मिनिषाने तिला देण्यात आलेल्या शक्तिचा वापर करून सुशांतला सेवकाच्या भूमिकेत धाडलेले असते. सुशांतला सेवकाच्या कार्यातून मुक्त करण्याबाबतच्या प्रश्नाला सुशांतची जवळची मैत्रिण करिश्मा नकारार्थी उत्तर देते, तर गौतम आपला होकार नोंदवितो. करिश्माचा नकार ऐकून घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्याचवेळी करिश्मा गौतमशी तिच्या मेकबॉक्सवरून वाद घालते. मेकअप बॉक्स मिळविण्यापेक्षा सुशांतला सेवकाच्या कार्यातून मुक्त करणे जास्त महत्वाचे असल्याचे सांगत गौतम करिश्माला समजाविण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु मेकअप बॉक्स न मिळाल्याने करिश्मा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि चिडून गौतवर आगपाखड करते. त्याच्यावर जोरजोरात ओरडते. अखेर बऱ्याच शाब्दीक चकमकीनंतर सुशांतला सेवकाच्या कार्यातून मुक्त करण्याच्या गौतमच्या मताशी सहमत होऊन, करिश्मा आपला होकार नोंदविते. या सर्व प्रकारामुळे सुशांत कमालीचा दुखी होतो. घरातील सदस्यांनी हा सर्व प्रकार पाहील्याचे कार्य संपवून बाहेर आलेल्या करिश्माला समजते. त्यांच्याबरोबरचे आपले मैत्रिपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी करिश्मा आपली बाजू संमजाविण्याचा प्रयत्न करते. मित्रांबाबतच्या तिच्या या वागण्याने करिश्मा घरातील सदस्यांचा रोष ओढवून घेते. सुंदर दिसण्यासाठी आपला मेकअप बॉक्स प्राप्त व्हावा म्हणून आगपाखड करणाऱ्या करिशामाला उपेन समजावतो की, जर तीला सुंदरच दिसायचे होते, तर सुशांतला वाचवून ती सगळ्यांच्या नजरेत महान झाली असती.