प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक बिस्वजित हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर चरित्रात्मक चित्रपट काढत असून त्यात देशभक्तीपर गीताच्या गायनासाठी त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गळ घातली आहे. लतादीदी गीत सादर करण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे.
बिस्वजित यांनी सागितले, की लता मंगेशकर यांना आपण भेटलो असून ही बैठक सकारात्मक झाली, त्यांनी या विनंतीत स्वारस्य दाखवले असून त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी दिग्दर्शकांना त्यांच्या निवासस्थानीच ध्वनिमुद्रण करण्यास सांगितले आहे. या चित्रपटात भारतमाता हे शीर्षक गीत असून ते लताजींशिवाय कोणीच उत्तम गाऊ शकत नाही, त्यामुळे आपण त्यांना विचारले व लताजी स्टुडिओपर्यंत प्रवास करू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानीच गाण्याचे ध्वनिमुद्रण करावे,
असे उषा मंगेशकर यांनी स्पष्ट केले. यापूर्वी लता मंगेशकर यांनी २०१० मध्ये शेवटचे गीत सादर केले होते.
बिस्वजित यांनी सांगितले, की या चित्रपटाचे नाव ठरवलेले नाही पण अल्बममध्ये आझाद हिंद सेनेचे ‘कदम कदम बढाये जा’ हे गीत असेल व सुभाषचंद्र बोस यांच्या मूळ रचना असतील. एक गीत नुकतेच सुखविंदर सिंग यांनी ध्वनिमुद्रित केले आहे. सध्या बिस्वजित हे मुंबई, कोलकाता व दिल्ली येथील ऑडिशन्समध्ये व्यस्त आहेत. भोजपुरी, मराठी, दक्षिण भारतीय, बंगाली चित्रपट उद्योगातील कलाकार व जपान, इंग्लंड व जर्मनीतील कलाकारांना संधी देणार आहेत. त्यांनी नेताजींवर आधी माहितीपट व दूरचित्रवाणी मालिका केली आहे. चित्रपटाच्या पटकथेबाबत आपण समाधानी नाही व त्यात सुधारणा चालू आहेत. पुढील वर्षी २३ जानेवारीपासून (नेताजींची जयंती) या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल. कटक येथे आपण चित्रीकरण सुरू करू कारण तेथे नेताजींचा जन्म झाला होता नंतर पश्चिम बंगालमधील सुभाषग्राम येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरीही चित्रीकरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.