प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने काळविटाची शिकार केल्याच्या प्रकरणी त्याला दोषी ठरवण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निकालास राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला असा आदेश दिला की, कनिष्ठ न्यायालयाने त्याला पाच वष्रे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली असताना त्यावर सलमान खानने जे अपील केले होते त्याची फेरसुनावणी करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, सलमान खान याला परदेशात जाण्याची खरोखर गरज असेल तर त्याने उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी. सलमानने जेव्हा दोषी ठरवण्यास स्थगिती देण्याचा विनंती अर्ज केला होता तेव्हा आपल्याला परदेशात चित्रीकरणासाठी परदेशात जाता येणार नाही त्यामुळे दोषी ठरवल्यास स्थगिती द्यावी असे म्हटले होते. आता स्थगिती रद्दबातल झाल्याने त्याला चित्रीकरणासाठी परदेशात जाता येणार नाही.
निकाल जाहीर करताना न्या. मुखोपाध्याय यांनी असे म्हटले आहे की, चित्रपट अभिनेता सलमान खान न्यायालयाला असे सांगू शकतो की, आपल्याला दोषी ठरवण्याच्या निकालास स्थगिती दिली नाही तर त्याचे भरून न येणारे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तात्पुरती सुटका मिळू शकते.