नाताळच्या निमित्ताने सरत्या वर्षांचा शेवट आणि नव्या वर्षांची चाहूल लागण्याचे दिवस जवळ आले की पहिल्यांदा चर्चा सुरू व्हायची ती हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणते कलाकार कोणत्या शहरात-हॉटेलात नववर्ष स्वागताच्या पार्टीत सहभागी होणार.. कोणता डान्स करणार.. त्यापोटी किती लाख-कोटी रुपये कमावणार याची. मात्र, सध्या वर्षभर एकानंतर एक चित्रपट करणाऱ्या कलाकारांची एवढी दमछाक होते की या ताणातून सुटका मिळावी म्हणून नाताळच्याच दिवशी सामानसुमान आवरून मुंबईबाहेर पळण्याची रीत सुरू झाली आहे. आताही बॉलीवूडचे आघाडीचे कलाकार सुट्टीसाठी गायब झाले असून आता नव्या वर्षांच्या आगमनानंतरच ते मायानगरीत परततील.
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये बांधले गेलेले जोडपे दरवर्षीप्रमाणे नव्या वर्षांसाठी न्यूयॉर्कमध्ये असणार आहे.
ent01
कतरिना नाताळ साजरा करण्यासाठी याआधीच लंडनला आपल्या घरी पोहोचली असून ३१ डिसेंबरला ते दोघेही त्यांच्या आवडत्या न्यूयॉर्कला जाणार आहेत. दीपिका पदुकोणने तर दोन आठवडे अगोदरच कुटुंबीयांबरोबर मालदीव गाठले असून ३१ डिसेंबरला ती आणि रणवीर सिंग दुसऱ्या ठिकाणी जातील, अशी चर्चा आहे. रणवीरलाही खास तेवढय़ासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आठवडय़ाभराची सुट्टी दिली आहे. सैफ आणि करिना कपूर खान या दोघांनाही स्वित्र्झलडमध्ये सुट्टी घालवायला आवडते. त्यामुळे ते दोघे नववर्षांच्या पूर्वसंध्येला स्वित्र्झलडमध्ये आहेत. ‘आशिकी २’ फेम श्रद्धा कपूर आणि वरुण धवन दोघेही ‘एबीसीडी २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लास वेगासमध्ये आहेत. त्यामुळे दिग्दर्शक प्रभुदेवाबरोबर संपूर्ण टीम तिथेच नव्या वर्षांचे स्वागत करणार आहे. हे वर्ष संपता आणखी एक जोडी नव्याने चर्चेत आली आहे ती ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातली सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट. आतापर्यंत आलियाचे नाव अर्जुन कपूरशी जोडले जात होते. प्रत्यक्षात सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया यांची सध्या जोडी जमली असून नवीन वर्षांसाठी या नव्या जोडीने गोव्याला आपली पसंती दिली आहे. ‘खिलाडी’ अक्षय कुमार सहकुटुंब केप टाऊनच्या सफरीवर आहे. तर ‘मेरी कोम’मधून या वर्षी आपला ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा गोव्याच्या जवळ असलेल्या आपल्या फार्महाऊसवर नातेवाइकांबरोबर नववर्ष साजरे करणार आहे.
बॉलीवूडचे पहिले तीन ‘खान’ वर्षभर शंभर कोटी, दोनशे कोटी अशी पळापळ करून दमलेले असतात. सध्या यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘फॅन’च्या चित्रीकरणात व्यग्र असलेला शाहरुख नव्या वर्षांसाठी सहकुटुंब दुबईतील आपल्या नवीन घरी असणार आहे; तर सलमान खान दरवर्षीप्रमाणे आपल्या घरच्यांसह पनवेलच्या फार्महाऊसवर नव्या वर्षांचे स्वागत करणार आहे. सगळय़ात शेवटी चित्रपट करून पहिला येणारा आमिर खान. ‘पीके’नंतर आमिरने वांद्रय़ातील आपल्या नवीन घरीच नववर्षांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी किरण, मुलगा आझाद आणि अम्मी यांच्याबरोबर आमिर घरीच थांबणार आहे.