एकाचवेळी चार-पाच मराठी चित्रपट प्रदर्शित झाले की कोणालाच तिकीटबारीवर गल्ला जमवता येत नाही. मग केवळ ‘आला आणि गेला’ या यादीत त्यांची नोंद होते. काही केल्या मराठी चित्रपट निर्मात्यांचा हा गोंधळ संपता संपत नाही. मात्र, याबाबतीत एरव्ही काटेकोर नियोजन करणाऱ्या बॉलीवूड कलाकारांचीही या वेळी अशीच त्रेधातिरपीट उडाली आहे. बॉलीवूडच्या दोन खानांमध्ये पुढच्या वर्षीच्या ईदसाठी जुळवणूक झाली असल्याने सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. पण, तसे झाल्यास ‘सुलतान’, रणबीर कपूरचा ‘ऐ दिल है मुश्कील’ आणि अजय देवगणचा बहुचर्चित ‘शिवाय’ अशा तीन चित्रपटांची दिवाळीत गर्दी होणार असून ते या तिन्ही चित्रपटांच्या कर्त्यांधर्त्यांना परवडणारे नाही.
हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग मोठा असल्याने त्यांना एकाच वेळी तीन-चार चित्रपट प्रदर्शित झाले तरी फरक पडत नाही, असे म्हटले जाते. तरीही १०० कोटींचे गणित सांभाळण्यासाठी मोठे कलाकार आपले चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करत नाहीत. किंबहुना, बॉलीवूडची ‘खाना’वळ तर आपला चित्रपट प्रदर्शित होण्याआधी एक आठवडा आणि नंतरचा एक आठवडा कोणत्याही मोठय़ा कलाकाराचा, निर्मात्याचा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, याची काळजी घेतात. मात्र, या वर्षी शाहरुख खानने नेहमीप्रमाणे ईदचा मुहूर्त सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’साठी ठेवून स्वत:चा ‘दिलवाले’ दिवाळीत प्रदर्शित होईल, असे नियोजन केले. त्यामुळे या वर्षीचे गणित सुटले असले तरी शाहरुखने आपला ‘रईस’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पुढच्या वर्षीच्या ईदचा मुहूर्त जाहीर केला. पाठोपाठ, यशराज प्रॉडक्शन्सने त्यांच्या सलमान खानची भूमिका असलेल्या ‘सुलतान’ चित्रपटासाठीही ईदचीच तारीख जाहीर केल्यानंतर एकदम हालचालींना वेग आला आहे.
सलमान आणि शाहरुख खान यांच्यात पुन्हा झालेली दिलजमाई नव्याने बहरते आहे. या मैत्रीखातर शाहरुखने पुढच्या वर्षीची ईद आपल्या ‘रईस’साठी ठेवण्याची विनंती केली. कधी नव्हे ते सलमाननेही याबाबतीत विचार करून ‘सुलतान’ दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र, सलमानचा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असेल तर रणबीर कपूर आणि अजय देवगण या दोघांनाही ते अडचणीत आणणारे ठरणार आहे. ‘ऐ दिल है मुश्कील’ हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनचा असून खुद्द करण जोहर इतक्या वर्षांनी दिग्दर्शक म्हणून समोर येणार असल्याने हा चित्रपट रणबीर कपूरच्या कारकीर्दीसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर ‘शिवाय’चे दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय अशा तिहेरी आघाडय़ा सांभाळणाऱ्या अजय देवगणसाठी हा सगळ्यात महत्त्वाकांक्षी आणि खर्चीक चित्रपट ठरणार असल्याने त्यालाही या चित्रपटाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. एकूणच, पुढच्या दिवाळीत यापैकी कोणता चित्रपट प्रदर्शित करावा आणि कोणता पुढे ढकलावा, यावरून दिवाळीआधीच या कलाकारांमध्ये वादाचे फटाके फुटणार आहेत.