भारतात होणारे फॅशन शो आणि त्यांना लागणारी बॉलीवूड अभिनेत्रींची हजेरी ही आता नियमित बाब झाली आहे. पण आता बॉलीवूड अभिनेत्रींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत डिझायनर्सचे शोज, गाला पार्टीज यांना भेटी देण्याचे प्रमाणही वाढले आहे. नुकतेच ऐश्वर्या राय बच्चनला नामवंत डिझायनर जॉर्जिओ अरमानीकडून एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात अरमानी यांच्या पॅरिस येथील शोमध्ये सोनम कपूरने हजेरी लावली होती. गेल्या दोन वर्षांंपासून बॉलीवूडच्या आघाडीच्या नायिकांना आंतरराष्ट्रीय डिझायनर्सच्या फॅशन शोसाठी आमंत्रित केले जाऊ लागले आहे. आंतरराष्ट्रीय डिझायनर्स आणि त्यांचे उंची गाऊन्स यांचे आकर्षण बॉलीवूड नायिकांना नेहमीच होते. रेड कार्पेट समारंभांपासून ते पार्टीजमध्येही या नायिका आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्सचे कपडे मिरविताना दिसतात. कपडय़ांमध्ये ‘डिओर’, ‘शनेल’, ‘अरमानी’ आणि बॅग्स, शूजमध्ये ‘लूइ विटोन’, ‘जिमी शू’, ‘प्रादा’ हे ब्रॅण्ड्स बॉलीवूड सेलेब्रिटीजचे विशेष पसंतीचे आहेत. त्यामुळे या नायिका ब्रॅण्ड्सच्या आणि डिझायनर्सच्या सतत संपर्कामध्ये राहू लागल्या आहेत. ‘स्लमडॉग मिलिनिअर’च्या यशानंतर फ्रिदा पिंटो जगभरात परिचयाचे नाव बनले होते. त्यानंतर या डिझायनर्सच्या शोला तिची हजेरी नित्याची होऊ लागली होती. तिच्याखेरीज मात्र भारतातील इतर अभिनेत्रींना या शोजमध्ये जाण्याची संधी मिळाली नव्हती. पण गेल्या दोन वर्षांत अुनष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, कंगना राणावत, सोनम कपूर या बॉलीवूड अभिनेत्र्यांनी या शोना नियमित हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्यात सोनमने अरमानी यांच्या ‘कुटूर फॅशन वीक’साठी पॅरिसला हजेरी लावली होती. त्या वेळी तिने घातलेल्या सोनेरी ड्रेसची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली होती. मार्च महिन्यामध्येच ‘लूइ विटोन’ ब्रॅण्डने त्यांच्या शोसाठी कंगनाला आमंत्रण पाठविले होते. मागच्या वर्षी तिला ‘बर्बेरी’ ब्रॅण्डनेही फॅशन शोचे आमंत्रण दिले होते. अनुष्कालाही यंदा याच ब्रॅण्डने लंडन फॅशन वीकसाठी आमंत्रित केले होते. सोनाक्षीलाही ‘लूइ विटोन’ ब्रॅण्डने यापूर्वी त्यांच्या शोसाठी आमंत्रित केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय डिझायनर्सना भारतात नव्याने उदयास येणारा उच्च मध्यमवर्गीय गट आणि त्यांना ब्रॅण्डेड गोष्टींचे विशेषत: कपडे, दागिने, बॅग्स, शूजमध्ये असलेले आकर्षण यामध्ये एक नवी बाजारपेठ सापडली आहे. भारतीयांचे बॉलीवूडवरील प्रेम जगापासून लपून राहिले नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये आपले नाव सतत चर्चेत राहण्यासाठी ते आता बॉलीवूड सेलेब्रिटीजना आपल्या शोजसाठी आमंत्रित करू लागले आहेत, हे नक्की.