१३ मेपासून फ्रान्सच्या कान नगरीमध्ये सुरळीतपणे सुरू असलेल्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला मंगळवारी हील्स शूज न घातल्यामुळे झालेल्या वादाने गालबोट लागले. रविवारी रात्री ‘कॅरोल’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पन्नाशीतील महिला पाहुण्यांच्या बुटांची उंची रेड कार्पेटच्या नियमांना साजेशी नसल्यामुळे सुरक्षारक्षकांनी त्यांचा प्रवेश रोखला होता. त्या वेळी त्यातील काही जणींनी वैद्यकीय समस्येमुळे हील्स घालता येणे शक्य नसल्याचे सुरक्षारक्षकांना सांगितले. सोशल मीडियावर या प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या. सुरुवातीला आयोजकांकडून या प्रकाराची जबाबदारी नाकारण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर मात्र हे प्रकरण निव्वळ गैरसमजातून झाले असल्याचे सांगत संचालक थेअरी फ्रेमॉक्स यांनी संबंधितांची माफी मागितली.