आदेश बांदेकर
पहिल्या दिवशी सकाळी आम्ही बाबांसोबत माझ्या लहान भावाच्या घरी बोरिवलीला दिवाळसण साजरा करतो. त्यानंतर संध्याकाळी माझ्या घरी दिवाळी साजरी केली जाते. फराळाचा मनसोक्त आनंद आम्ही घेतो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी कुठेही जात नाही आणि हातात कोणतेच काम घेत नाही. वर्षभर मी घराबाहेर असतो त्यामुळे हा एक दिवस मी माझ्या घरच्यांसाठी खास राखून ठेवलेला आहे. आम्ही पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करतो. सुचित्रा आणि वहिनी मिळून रांगोळ्या काढतात. दिव्यांची आरास केली जाते. हा सण तर सर्वांनाच प्रिय आहे. माझे बालपण काळाचौकीच्या अभ्युदय नगरमध्ये गेले. लहान असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे सर्वात पहिला अॅटमबॉम्ब कोण लावेल याकडे सर्वांचा कल असायचा. सर्वात पहिला अॅटमबॉम्ब लावणे हे तेव्हा आम्हाला भूषणावह वाटायचं. याचा सर्व रहिवाशांना त्रास व्हायचा. बिल्डींग क्र. ५मध्ये मी राहायचो. यात एकूण ९० कुटुंब होती. तेव्हा कुठल्याही घरी जाऊन फराळ खाण्याचा आनंद आम्ही घ्यायचो. या गोष्टी मला आता खूप आठवतात. मी घरच्यांना कधीच ठरवून भेटवस्तू घेत नाही. दिवाळी आहे म्हणून काही विशेष भेट घ्यावी असे काही मी करत नाही. तसही आता वर्षभर भेटवस्तू सुरुच असतात. त्यामुळे वर्षभर दिवाळीच चालू असते असं म्हणायला हरकत नाही.