अतुला दुगल
दिवाळी ‘आपला सण’ असल्याने ती पारंपारिक पद्धतीने व कुटुंबासोबतच साजरी करावी असे माझे मत व मन आहे. त्यामुळे या दिवसात मी आमच्या पुण्याबाहेर जात नाही. हल्ली फराळ तयार मिळतो तरी मी आईला नोकरीतून सुट्टी घेवून चिवडा व चकली करायला सांगते. हे माझे खास आवडते पदार्थ आहेत. आकाश कंदिलही विकत मिळत असला तरी मी मात्र तोही घरीच करते. ‘आपला कंदिल खूप वेगळा दिसावा’ अशीच त्यामागे ‘दृष्टी’ असते. मी व बहिण मिळून आमच्या सोसायटीच्या पाय-यांपासून पटांगणापर्यंत रांगोळी घालतो. पहाटेच हे करीत असल्याने सगळ्यांची ‘दिवाळी पहाट’ आनंदाने सुरु होते आणि त्यात पाडव्याच्या पहाटे मी सारस बागेतील एक लाख दिव्यांची आरास पाहायला आवर्जून जाते. डोळे अगदी दिपून जातात, प्रसन्न वाटते. एकूणच दिवाळीचे वातावरण प्रसन्न व दिलखुलास असते. मला ते खूप खूप आवडते, त्यातूनच ऊर्जा, उमेद व उत्साह मिळतो.