किशोरी शहाणे
दिवाळी हा इतरांप्रमाणेच माझादेखिल खूप आवडता सण. इतरवेळी खाण्या-पिण्यावर प्रचंड नियंत्रण ठेवून वजनवाढ होवू नये यावर विशेष लक्ष देणारी मी दिवाळीच्या फराळावर मात्र व्यवस्थित ताव मारते. चकली, रकंजी, लाडू, मिठाई काही विचारू नका. त्यात माझे सासर पंजाबी. त्यामुळे खाण्यापिण्याची प्रचंड चंगळ. काही दिवसानी यामुळे वाढलेले वजन कमी करण्याचे कष्ट घ्यावेत. व्यायाम करावा. जुहूच्या आमच्या घरी मी स्वत: आजही रांगोळी काढते. रोषणाई करते, जमेल तसे फटाके उडवते. पण मला फराळाचे करता येत नाही. त्याची संधी आणि सराव कधी मिळालाच नाही. आठवणीतील दिवाळी सांगायची तर पंधरा वर्षापूर्वी हेमा मालिनीसोबत ऐन दिवाळीतच मी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेले होते. तेव्हा मला घरची खूप आठवण आली. माझे पती दीपक बलराज, माझी आई असे सगळेच इकडे दिवाळी साजरी करीत असताना मी मात्र तिकडे अमेरिकेत होते. तेव्हा मला तेथे रडू आले आणि इकडे फोन केला.