‘कॅमेरा डिपार्टमेंटला असतो आता…’
काय…? मी थोडासा चकीत…
हो कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये काम करतो मी आता म्हंटलं तेवढंच शिकाव काहीतरी…
बोलणारे गृहस्थ देसाई काका होते.
साठीकडे झुकलेले…टक्कल, थोडेसे पांढरे केस…चष्मा.
आठ-दहा वर्षांपूर्वी माझी या माणसाशी ओळख झाली होती
कुठल्याशा शुटिंगच्या निमित्तानं…
तेव्हा ते कलाकारांना ने-आण करणाऱया गाडीवर चालक होते
गाडी तुमचीच…?
हो माझीच…
हा आमचा पुसटसा संवाद झाला होता.
तसं फार लक्षात येणारं काम नाहीये या मंडळींचं…
कुणासाठी ए…., कुणासाठी ओ ऐका ना…
कुणासाठी ड्रायव्हर आणि कुणासाठी वयानं मोठे आहेत म्हणून ड्रायव्हर काका
एव्हढंच…
मला आठवतंय आम्हा दोन-तीन कलाकारांना न्यायला ते आले होते.
आम्हाला घेऊन ते चित्रीकरणस्थळाकडे निघाले होते.
जरा गाडी थांबवा ना, सिग्रेटी घ्यायच्या आहेत.
एक आवाज गाडीतल्यांपैकी
गाडी थांबली…सिग्रेटी आणायला मंडळी गेली…
मी देसाईंकडे पाहात होतो…
पांढऱया अर्धवट दाढीचे खुंटं वाढलेल्या माणसाला काय वाटत असेल…?
तो स्वतःबद्दल, इतरांबद्दल, आपल्याबद्दल काय बोलत असेल. मनातल्या मनात…
किती विचार चालू असतील त्याच्या मनात
आणि मी आता त्यांच्या उत्तरावर विचार करत होतो..
कॅमेरा डिपार्टमेंट…
व्वा… भारी वाटलं मला…
रुममध्ये जाईपर्यंत आत्मसंवाद सुरू होता.
का बरं ते आले असतील या कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये,
काय असं वाटलं असेल आणि आपण नुसतं ड्रायव्हर राहायचं नाही तर काहीतरी वेगळं करून पाहावं. पुढचं काहीतरी करावं.
नवं काहीतरी शिकावं…
त्या रात्री देसाईकाकांना शोधत राहिलो फेड टू ब्लॅक होईपर्यंत…
पुढच्या दिवशी कॅमेऱयाच्या गाडीचं सारथ्य करत सेटवर आले.
त्यांचा पेहराव बदलेला…बरम्युडा, टी-शर्ट…
सुटसुटीत हालचाली करण्यासाठी ही मंडळी असा पोषाख करत असावीत.
इथंपर्यंत ठिक होतं.
जेव्हा शुटिंग सुरू झालं आणि तात्रिक शब्दांबरहुकूम देसाई झेपावत होते. ते पाहून हबकलोच…!
विविध फिल्टर्सची नावं, लेन्सच्या नावाबरहुकूम ते ती संबंधित माणसाच्या हातात देत होते.
कलाकार मंडळी बरीच वर्षे काम करतात पण कुठली लेन्स कशाची आणि कसले फिल्टर कशासाठी हेही आम्हाला माहिती नसतं…
लाजायला झालं थोडं…
त्या सगळ्या गोष्टी/वस्तू हाताळतांना त्यांच्या हालचालीत एक ऊर्जा होती. एक तत्परता होती. आकार घेत असलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीचे आपणही एक भाग आहोत हेच त्यांच्या देहबोलीतून प्रतीत होत होतं.
आणि महत्त्वाचं म्हणजे डोळ्यात एक वेगळीच लकाकी होती. डोळे चमकदार आणि समाधानी होते.
कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये काम करायचं म्हटल्यावर डोळ्यात वेगळी नजर हवीच नाही का…?
तसं काहीतरी असावं ते…
मी अंतर्मुख होतो…
ते माझ्या नजरेसमोर हळूहळू आऊटफोकस होतात. मी बरम्युडा, टी-शर्ट, चष्मा आऊटफोकस होऊन हलकेच तरळतांना पाहतो आणि…
कुठून येतं हे सगळे…
स्वतःलाच विचारत सुटतो…
मी त्यांचं वय, घर, त्यांची मोठी मुलं यांचे गणित मांडतो. खूपच न्यून वाटायला लागतं मला…
त्यांची आऊटफोकस आकृती बारीक-बारीक डोळ्यासमोर तरळत होती आणि माझ्या न्यूनत्वात भरत पडत चालली होती…
आपल्यातली नवं नवं शिकण्याची, हुन्नर आत्मसात करायची ऊर्मी कुठं हरवून गेली…?
कुठे राहिलो मागे…?
आपण तेच-तेच करतोय आपल्याला येत तेच रोज-रोज.
नव्याचा शोध संपला का आपला…?
असे अनेक प्रश्न दोन्ही कानांना आदळत घुमत होते.
त्यांना या वयात काय गरज आहे…?
गरज…
बस…
या गरजेपुढे तर येऊन थांबतं सगळं…
आपल्याला काय गरज शिकायची…
देसाईकाका या गरजेच्या पुढे निघून गेले होते. मुक्त एकदम.
हे नवनवीन शिकायची गरज निर्माण व्हायला हवी…
पण काय गरज…?
असा प्रश्न पडतो. मी तिथंच खुंटतो, भेलकांडत राहतो, हेलकावत राहतो, कुढत राहतो असे अनेक देसाईकाका पाहात… न्यून-न्यून होत जातो रोज…
ता.क.
शिक्षण संपलं असं का वाटतं मला
मी थांबवलय…
– मिलिंद शिंदे