‘सर एक सेल्फी’…?
हो.
ठिकाण. एक सार्वजनिक स्वच्छतागृह.
बघा…
बाहेर जाऊन फोटो काढला तर नाही का जमणार…?
नाही सर इथंच वेगळं वाटेल…
वेगळं…?
वाटेल…?
असं जगणं.
सेल्फी.
अलीकडे व्यक्त होण्याची जी समाजमाध्यमे आहेत, त्यावर मध्यंतरी काही ओळी फिरत होत्या.
पूर्वी दोघांचं भांडण झालं तर तिसरा मिटवायला जात होता. आता तो भांडण होऊ देतो, आधी आपला मोबाईल काढतो आणि सगळं शूट करतो. त्याच्यासाठी ते घबाड असतं, इतरांना पाठवण्यासाठी.
असा कसा झालोय ना मी…?
परवा एका शेतकरी विषयक कार्यक्रमात एक महिला आपल्या पतीविषयी (मयत) व तिच्या सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीविषयी पोटतिडकीनं बोलत होती. बोलता, बोलता तिला भावना अनावर झाल्या. त्या आवेगातच ती भोवळ येऊन पडली. एकच गलका झाला…
तिथेही मोबाईलधारक होतेच…
ते सरसावले लगेच, जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखे. त्यांना ते कॅप्चर करायचं होतं. सोशल मीडियावर टाकायला.
ती मरेल, तिला काय झालंय, आपल्याला तिच्यासाठी काही करता येईल का? हे बाजूला ठेवून यांचा व्हिडिओ मोड चालूच…
अलीकडच्या जीवनमानाचं आद्यकर्तव्य…
खरंतर या मोबाईलधारकांना (कॅमेरावाले) ती क्लीप जेवढी वेदनादायक होईल तेवढं चांगलं…
किंबहुना ती व्यक्ती मेलीच तर चांगलं ‘सेव्ह’ करायला.
कारण त्या व्यक्तीच्या मरणाचा exclusive व्हिडिओ फक्त या विरांकडेच असणार…
भावना बोथट झाल्या
मूक कॅमेरा मात्र क्लीक, क्लीक करतोय
एकमेकांशी मत-मतांतरं शेअर करण्यापेक्षा हे असे व्हिडिओ शेअर करतो व्यक्ती.
ही तर हद्दच होती.
एका माणसानं प्रेताला खांदा दिला होता, त्या खांदेकऱयानं (खरं तर मोबाईलधारकानं, selfie स्पेशालिस्टनं) असा काही फोटो कंपोज केला होता की, त्याचा चेहरा उजव्या बाजूला बोल्ड आणि त्याच्या डाव्या कोपऱयात Deep Background ला मयत (प्रेताचा) व्यक्तीचा चेहरा. काय कम्पोजिशन… काय करणार कुणास ठाऊक तो या फोटोचं…? म्हणजे मी कसा खांदा दिला वगैरेचा पुरावा की काय…?
आता सवय लागलीय, त्या मोबाईललाही सगळं बंदिस्त करायचं असतं. रस्त्यावरची मारामारी, विनयभंग, मुलीची छेडछाड, बलात्कार, दंगल, खून, मुलीला जाळून मारतांना, माणसं मारतांना…
सगळं-सगळं कॅप्चर करायचं असतं.
लाईक्स मिळण्यासाठी (?)
शेअर (?) करण्यासाठी
मध्यंतरी एका मॉलमध्ये एका मुला-मुलींचा ग्रुप आपापसात पैज लावत होता.
‘चल उस लडके के साथ सेल्फी खिचके दिखा’
पैज लागली
ती मुलगी गेली ना धडक. त्या मुलाला म्हणाली,
‘मेरेको तुम्हारे साथ एक सेल्फी निकालने का है’ (हे एक अलीकडचं भारी आहे, जे काय आहे ते हिंदीत बोलायचं)
Click…
एकच जल्लोष…
काय पेरणी
कसल्या शर्यती
हा मोबाईल कॅमेरा धोकादायक होत चाललाय…
ता.क.
‘नेटपॅक = जेवण’
– मिलिंद शिंदे