‘विक्रम रेवती XXX’
असं नाव सांगितलं त्या मुलानं
आडनाव मुद्दाम लिहित नाही, कारणं सगळ्यांना माहिती आहेतच.
(तसं हे नावही बदललेलंच आहे…)
पण तथ्यांश असा…
की त्या मुलानं
स्वतःचं, त्याच्या आईचं आणि त्याच्या आईचच आडनाव सांगितलं होतं…
उत्तम आहे
आईचं नाव लावायलाच पाहिजे.
ते महत्त्वाच(च) आहे(च)
पुढचं फार भयानक होतं हो…
काय…SS? मी.
(मी गतिमंद मुलांच्या भावविश्वावर चित्रपट करतोय, असं कळल्यावर त्या शाळेच्या प्रांगणातच त्या आजी माझ्याशी बोलत होत्या…)
काय अहो काय काय…?
आईच नाव लावायलाच पाहिजे पण…
‘पण काय…?’ मी चिकीत्सक…
‘मी त्या शाळेत मुख्याध्यापिका आहे ना, आता आलेय खर रिटायरमेंटला…’
त्यानंतर त्या आजीबाई बोलतच सुटल्या.
झपाटल्यासारख्या पण आत्मीयतेनं…
‘त्याला मी विचारलं तुझे वडील…’
तर तो मुलगा पटकन म्हणाला,
ते देवाघरी गेले… मला वाईट वाटलं फार
आपण उगाचच विचारलं…
पण जेव्हा त्याच्या आईला विचारलं की काय हो कसं झालं निधन तुमच्या पतीचं…
या वयात (फार) पार आभाळ कोसळलं असेल ना…
तर त्या मुलाची आई म्हणाली..
‘नाही, नाही ते जिवंत आहेत…पण आमचा डायवोर्स झाला ना…
त्यानं वारंवार विचारू नये म्हणून सांगून टाकलं एकदा.’
मेले. सॉरी, देवाघरी गेले म्हणून…
युक्तीवाद पटल्यासारखं वाटलं…
मी माझ्या नातवाला या गतिमंदांच्या शाळेत टाकलं, कारण तो सामान्यांसारखा व्हावा म्हणून
माझ्या घरच्या काही लोकांना तो आवडत नाही…
त्यांना त्याचं असं गतिमंद असणं आवडत नाही.
ते टाळतात माझ्या नातवाला…(नातू त्यांच्या सोबतच होता) अगदी याचे आई वडील सुद्धा…
लाजीरवाणं वाटतं त्यांना…
ते टाळतात याला, सार्वजनिक ठिकाणी नेण्याचं…
मी मात्र लाजत नाही.
त्याला सगळीकडे घेऊन जाते
त्याचा हक्कच आहे तो.
कुणीतरी नाकारले म्हणून हक्क ‘बाद’ होत नाहीत ना?
त्याला जगायचं बळ दिलं पाहिजे की नाही?
मी देते.
मी देणार.
सदैव.
पण या मुलाचं ऐकून जरा चमकलेच…चिंताक्रांत झाले…
की समजा उद्या या मुलाला कळलं की याचे बाबा जिवंत आहेत, अगदी धडधाकट तर…?
त्याच्या मनाचं काय…?
त्याच्या मानसिक संतुलनाचं काय…?
कसा रिअॅक्ट होईल तो…?
मी विचार करू लागले…
कसं आहे, थोडा मनाचा कोपरा वापरला जातोच ना,
मुलांचा अशा धांडोळ्यासाठी…?
थोडा मेंदू गुंततोच ना, त्याला चार मार्क कमी पडतात ते इथे…(हल्ली मार्कांच फार आहे ना…)
तो हरवतो ते इथं…
मुलांना असं अनसरटन, अंधारात ठेवायचं का?
तर तुमचं जमत नाही, नव्हतं म्हणून…?
आणि त्याचे बदले म्हणून (असे घेऊन) काय पेरतोय आपण…?
पुढं हे कसं उगवणार आहे याचं काही भान…?
कारण या पिढीचं खत हे सोशल मीडियाचं आहे, नाही का…?
‘तो रिअॅक्ट कसा होईल’
हा एकच प्रश्न मी स्वतःला विचारत होते बघाना हो,
मी माझ्या नातवाला या गतिमंद मुलांच्या शाळेत आणते,
त्याला शहाणपण यावं, चारचौघांसारखं करण्यासाठी नॉरमल (Normal, नॉर्मल) करण्यासाठी…
पण काही पालक आपल्या चारचौघांसारख्या नॉर्मल पाल्यांना अॅबनॉर्मल करण्यासाठी का झटतायत…
स्वतःच्या स्वार्थासाठी.
काळजी वाटते हो अशा मुलांची.
त्या बरंच काही बोलत होत्या
कळकळीनं, तडफेनं, बराचवेळ, सलग…
माझ्या नजरेसमोर त्या आऊटफोकसमध्ये जात होत्या.
मी मात्र फोकस क्लिअर करण्याचा प्रयत्न करत होतो.
सगळं शार्प दिसतंय पण, मांडणी चुकीची असलेलं…

ता.क.

हे सगळं काल्पनिक आहे (?)
Only mi (बाकी कमी) Day सुरू व्हायला हवा
– मिलिंद शिंदे