मतदार यादीतून नाव गहाळ झाल्याचा फटका विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बाबतीतही घडला. मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येईल अन्यथा मतदान करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात विविध क्षेत्रातील मान्यवरही मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहिले.
अभिनेते अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ‘एचडीएफसी’ बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख आदी मान्यवरांचा मतदान करण्यापासून वंचित राहण्यांमध्ये समावेश होता. अतुल कुलकर्णी आपल्या पत्नीसह गोरेगाव येथील मतदान केंद्रावर पोहोचले. तेथे गेल्यानंतर मतदार यादीत आपले नाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, गेली १२ वर्षे मी याच पत्यावर राहतोय. या अगोदर चार वेळा वेगवेगळ्या निवडणुकीत मी मतदान केले होते. या वेळी आमचे नाव कसे काय गायब झाले. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी तरी यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचेही नाव मतदार यादीत नसल्याने त्या ही या वेळी मतदान करू शकल्या नाहीत. वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर त्या आतापर्यंत मतदान करत आल्या आहेत. मतदान करता न आल्याने त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. ‘एचडीएफसी’ बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचेही नाव मतदान यादीतून गायब झाल्याने ते मतदान करू शकले नाहीत.

आम्ही मतदान केले..
* मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर दुबईला गेला होता. मात्र मतदान करण्यासाठी सचिन गुरुवारी सकाळी मुंबईत आला आणि त्याने मतदानाचा बजावला.
* उद्योगपती अनिल अंबानी यांनीही सकाळी मतदान करून आपले कर्तव्य बजावले.
* ज्येष्ठ दिग्दर्शक-गीतकार गुलजार, अभिनेत्री विद्या बालन, सोनम कपूर, मिलिंद सोमण, अमृता राव, प्रीती झिंटा, नेहा धुपिया, शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे,
    राहुल बोस, चित्रपट निर्माता दिग्दर्शक मधुर भांडारकर, कुणाल कपूर, श्रेया घोषाल, दिया मिर्झा,जॉन अब्राहम, रितेश देशमुख, शाहरूख खान आणि अनेक     मान्यवरांनीही मतदान केले. धर्मेद्र,सनी देओल यांनी जुहू येथे मतदान केले.
* अभिनेत्री आणि खासदार रेखा यांनीही सकाळी मतदान केले. मतदान करण्यासाठी त्या ‘ट्रॅक सूट’मध्ये आल्या होत्या. तर अभिनेत्री जुही चावला हीने, यावेळी आपण प्रथमच मतदान केल्याची कबुली देत एक नागरिक म्हणून कर्तव्यपार पाडल्याचा मनापासून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया ‘ट्विटर’वर व्यक्त केली.  
* बॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘आयफा’पुरस्कार वितरण सोहळा अमेरिकेत टाम्पा बे येथे होणार असल्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकार तिकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मतदानाला दांडी मारली. मात्र‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणाऱ्याकाही कलाकारांनी गुरुवारी सकाळी मतदानाचा हक्क बजावून त्यानंतरच टाम्पा बे कडे प्रयाण केले. यात ‘आयफा’ सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारा फराहन खानचा समावेश होता.
‘बाकी सगळे नंतर आधी मतदान’
२३ आणि २४ एप्रिल रोजी वृत्तपत्रातून आलेल्या नाटकांच्या जाहिरातींमध्ये सगळ्यांत वरती ‘बाकी सगळे नंतर आधी मतदान’ अशी ओळ टाकण्यात आली होती. मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी मराठी व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या कल्पनेतून हा आगळा प्रयोग करण्यात आला.