‘मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाला मंजुरी देण्याच्या मुद्यावरील वाद आता शिगेला पोहचला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या प्रमुख लीला सॅमसन यांच्यापाठोपाठ बोर्डाच्या नऊ सदस्यांनी शनिवारी राजीनामा दिल्याचे समजत आहे. सरकारच्या कथित हस्तक्षेच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांसह एका सदस्याने शुक्रवारी मंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आणखी आठ सदस्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले होते, परंतु चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अपिलीय लवादाने त्याचे प्रदर्शन करण्यास मंजुरी दिली, हे कळल्यानंतर मंडळाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला .मंडळाचे सदस्य व अधिकारी यांचा भ्रष्टाचार आणि कारभारात सातत्याने होणारा सरकारचा हस्तक्षेप यामुळे आपण राजीनामा दिल्याचे सॅमसन म्हणाल्या, तर त्यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचे मंडळाच्या सदस्य इरा भास्कर यांनीही जाहीर केले. सेन्सॉर बोर्डाच्या अपिलीय लवादाने ‘मेसेंजर ऑफ गॉड’ला मंजुरी दिली आहे, याची आपल्याला कल्पना आहे, मात्र त्याबाबतचा लेखी निर्णय मिळालेला नाही, ही मंडळाची थट्टा आहे त्यामुळे आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सॅमसन म्हणाल्या.

चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेपासून सरकार नेहमीच चार हात दूर राहिले आहे, असे स्पष्ट करून माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी शुक्रवारी लीला सॅमसन यांचे हे आरोप फेटाळून लावले. एखाद्या विशिष्ट सदस्याविरुद्ध पुरावे दिल्यास सरकार योग्य ती कारवाई करील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ज्यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे, त्या डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांनी गुडगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत, या चित्रपटात कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्यात आले नसल्याचा दावा केला.