महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने शाहीर संभाजी भगत यांच्या ‘अडगळ’ या प्रायोगिक रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकास कोणताही भाग न वगळता सादर करण्याची परवानगी दिली असली, तरी तेच नाटक आता अद्वैत थिएटर्सतर्फे ‘बॉम्बे- १७’ या नावाने व्यावसायिक रंगभूमीवर सादर होत असताना मात्र त्यातील तब्बल २३ आक्षेपार्ह भाग वगळण्याची सूचना करून कात्रीत अडकवले आहे. तथापि, लेखक संभाजी भगत यांना सेन्सॉर बोर्डाने घेतलेले हे आक्षेप मान्य नसून, त्यांनी सेन्सॉरला लिहिलेल्या पत्रात, ‘हे नाटक ज्या मानवसमूहाबद्दल बोलते, त्या मानवसमूहाचे वास्तव जीवनदर्शन चितारण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने नमूद केलेले आक्षेपार्ह भाग नाटकात अत्यावश्यक आहेत,’ अशी आग्रही भूमिका घेतली आहे.
धारावीच्या झोपडपट्टीतील माणसांचे दैनंदिन जगणे वास्तवदर्शी पद्धतीने चित्रित करणारे हे नाटक तिथल्या समग्र वास्तवासह ‘बॉम्बे- १७’ (पूर्वीचे नाव- ‘अडगळ’) या नाटकात संभाजी भगत यांनी चितारले आहे.
परिणामी तिथल्या माणसांच्या भाषेसह त्यांच्या उघडय़ावाघडय़ा जगण्याचे संदर्भ त्यात येणे स्वाभाविकच होय. फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील सेन्सॉर बोर्डाने हे लक्षात घेऊन नाटकातील कोणताही भाग न वगळता त्याचे प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग करण्यास त्यावेळी परवानगी दिली होती.
परंतु आता तेच नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येत असताना पुन्हा सेन्सॉरकडे परवानगीसाठी गेले असता त्यातील अनेक भागांवर सेन्सॉरने कात्री चालविली आहे. सेन्सॉरने जे भाग आक्षेपार्ह म्हणून वगळायला सांगितले आहेत ते जर नाटकातून काढून टाकले तर नाटकात जो आशय-विषय मांडलेला आहे त्यालाच छेद जाईल आणि त्याचे वास्तव दर्शन घडणार नाही, असे लेखक संभाजी भगत यांचे म्हणणे असून, आपण कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी किंवा चाळवण्यासाठी नाटकात सवंग भाषा वापरलेली नाही, असेही त्यांनी सेन्सॉरला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सध्या या नाटकाच्या तालमी सुरू झालेल्या असून, येत्या ९ ऑगस्ट रोजी शुभारंभाचा प्रयोगही निश्चित झालेला असताना सेन्सॉरने घेतलेल्या या हरकतीमुळे निर्माते राहुल भंडारे संत्रस्त झाले आहेत. मात्र, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा  हा लढा आपण लेखकासोबत सर्वशक्तीनिशी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.