‘दया दरवाजा तोड दो’ गेली सोळा वर्षे ‘सोनी वाहिनी’वरील ‘सीआयडी’ या मालिकेचे आणि विशेषत: त्यातील या संवादाचे गारुड आबालवृद्धांवर कायम आहे. पण लवकरच या संवादातील दयाची जागा जयवंती शिंदे ही मराठमोळी सीआयडी अधिकारी घेणार आहे. आपल्या टॉमबॉय लुकसाठी प्रसिद्ध असलेली तान्या अब्रोल सीआयडीमध्ये लवकरच ‘लेडी दया’च्या भूमिकेत येणार आहे. दर आठवडय़ाला गुंतागुंतीचा गुन्हा आपल्या खास शैलीमध्ये सोडवण्यासाठी प्रसिद्ध आसलेल्या एसीपी प्रद्युम्नच्या गटामध्ये एका नवीन कायमस्वरूपी अधिकाऱ्याची भर पडणार आहे. जयवंती शिंदे नावाची ही मराठमोळी अधिकारी असली तरी, ती कोणाशीही चार हात करण्यात सगळ्यांच्या पुढे असणार आहे. ‘चक दे’ चित्रपटातील आपल्या रांगडय़ा पंजाबी मुलीच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी तान्या अब्रोल ही भूमिका साकारणार असून सध्या ती भूमिकेसाठी लढण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
मालिकेमध्ये ती इतर पुरुष कलाकारांसोबत हाणामारी करताना, गुंडाशी चार हात करताना इतकेच नव्हे, तर बंद दरवाजे तोडणार आहे. या मालिकेमध्ये याआधी ही सर्व कामे दया करत असे. त्यामुळे हिला ‘सीआयडी’मधील ‘लेडी दया’ या नावाने ओळखले जाणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल सांगताना तान्या सांगते की, याआधी लोक तिला टॉमबॉय अवतारासाठी ओळखत होते. पण आता या मालिकेतून ती स्वत: एका रांगडय़ा अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने स्वत:चे स्टंट्ससुद्धा स्वत: करणार आहे. मुळची पंजाबी असलेली तान्या मालिकेत मात्र एका मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे इतर सर्वासोबतच तिने मराठीचे धडे घेण्यासही सुरुवात केली आहे. सध्या मला नीट मराठी बोलता येत नाही, पण स्क्रिप्टमध्ये लिहलेले संवाद वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे.