cake-450
“नको डोक्याला शॉक, चला हवा येऊ द्या” असं म्हणत मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांच्या युगात मनोरंजनाची नवी लाट घेऊन आलेला कार्यक्रम म्हणजे झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या”. मराठी चित्रपट आणि नाटकांना तिकीटबारीवर चांगले दिवस आले आहेत. यशाचे आणि लोकप्रियतेचे एकेक टप्पे हे दोन्ही माध्यमं गाठत आहेत आणि आता प्रेक्षकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. या दोन्ही माध्यमांबद्दलचं हे चित्र सकारात्मक असलं तरी अनेकदा योग्य प्रसिद्धीअभावी या कलाकृती लोकांपर्यंत नीट पोहचत नसल्याचं मत या क्षेत्रामधून व्यक्त होत होतं. अशातच झी मराठीने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पायंडा पाडणारा कार्यक्रम आपल्या प्रेक्षकांसाठी आणला. ज्यामध्ये आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटातील आणि रंगभूमीवर नव्याने आलेल्या नाटकातील कलावंत ‘चला हवा येऊ द्या’ या कॅफेत येऊन आपल्या चित्रपट किंवा नाटकाबद्दलची माहिती देऊ लागले. याला सोबत होती ती कॅफेचा मालक आणि निवेदक डॉ. निलेश साबळे आणि त्याच्या परीवारातील अतरंगी कलाकार म्हणजे भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके, सागर कारंडे, मानसी नाईक, श्रेया बुगडे, विनित बोंडे आणि भालचंद्र (भाऊ) कदम यांची. कधी धम्माल स्किट्सच्या माध्यमातून या सर्वांनी प्रेक्षकांना हसवलं तर कधी काही हळव्या आठवणींनी प्रेक्षकांना भावूकही केलं. अल्पवधीतच तुफान लोकप्रिय झालेला हा कार्यक्रम आता आपल्या भागांची पन्नाशी पूर्ण करतोय. येत्या मंगळवारी ३ फेब्रुवारीला रात्री ९.३० वा.हा पन्नासावा भाग प्रसारित होणार आहे.
cake-450-2
“चला हवा येऊ द्या” हा कॅफे आहे थुकरटवाडी या गावातला. या कॅफेत दर आठवड्याला मराठी मनोरंजन विश्वातील तारे तारका गप्पा मारायला येतात. निमित्त असतं ते त्यांच्या कलाकृतीच्या प्रमोशनचं. इथे हे प्रमोशन तर होतंच पण त्यासोबत तिथे घडतात अनेक धम्माल गोष्टी. थुकरटवाडीचे सरपंच भारत गणेशपुरे अनोख्या पद्धतीने पाहुण्यांचं स्वागत करतात तर निलेशचे बाबा भालचंद्र कदम विचित्र आणि ‘चुकीच्या’ पद्धतीने पाहुण्यांची ओळख करून देतात. चित्रपटाचा दिग्दर्शक बनण्याची हौस असलेला कुशल याच मंचावर आपली हौसही भागवून घेतो तर कधी लावणी नर्तीका, प्रत्येक गोष्टीत आक्षेप असणारी प्रेक्षक महिला बनून सागरही सर्वांना खो खो हसवतो. या अतरंगी कलाकारांसोबत पाहूणे म्हणून आलेले कलाकारही त्यांच्याच रंगात मिसळून जात एकच धम्माल उडवतात. ख-या अर्थाने मनोरंजक असलेला हा कार्यक्रम आज घराघरात लोकप्रिय झाला आहे. प्रत्येक आठवड्याला पाहूणे कोण? यासोबतच यात काय स्किट सादर होणार याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. जी लोकप्रियता टीव्हीवरील भागांना मिळते तसाच प्रतिसाद याच्या युट्युबवर अपलोड झालेल्या भागांनाही मिळतो. ‘चला हवा येऊ द्या’ च्या  जवळपास प्रत्येक भागाला युट्युबवर हजारोच्यावर हिट्स आहेत यातूनच या कार्यक्रमाची लोकप्रियता लक्षात येते. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणं आणि मराठी कलाकृतींना चांगली प्रसिद्धी देणं असा हेतू असलेला हा कार्यक्रम आपली पन्नाशी पूर्ण करतोय यानिमित्ताने याच्या सेटवर धम्माल सेलिब्रेशनही करण्यात आलं. येत्या मंगळवारी ३ फेब्रुवारीला हा पन्नासावा भाग रात्री ९.३० झी मराठीवरून प्रसारित होईल.