लोकांमध्ये उत्तम साहित्याची गोडी निर्माण व्हावी तसेच उत्तमोत्तम साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिर संकुलातील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि व्हिजन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला ‘चला, वाचू या!’ हा साहित्य अभिवाचन उपक्रम सुरू केला जाणार आहे. याचा प्रारंभ रविवार, २१ जून रोजी सायंकाळी ५.४५ वाजता अभिनेता- कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांच्या हस्ते केला जाणार आहे. दर महिन्याच्या प्रत्येक अभिवाचन कार्यक्रमाला रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. वाचन चळवळ वृद्धिंगत करणे, अभिवाचन कार्यक्रमांद्वारे उत्तमोत्तम साहित्य नव्या पिढीसमोर आणणे, यानिमित्ताने वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमाद्वारे अभिवाचनाचे एक कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देताना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सर्वच भाषांतील उत्तमोत्तम लेखन अभिवाचनाद्वारे सादर केले जाणार आहे. ‘व्हिजन’ संस्थेचे श्रीनिवास नार्वेकर, डॉ. उत्कर्षां बिर्जे तसेच त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून निरनिराळ्या उपक्रमांद्वारे अभिवाचनाचे कार्यक्रम करीत आहेत. ज्येष्ठ कलावंतांच्या सहभागाबरोबरच नव्या कलावंतांनाही अभिवाचक म्हणून या उपक्रमात संधी दिली जाणार आहे. त्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून निवड चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे यांनी दिली. निवड चाचणीसाठी इच्छुकांनी श्रीनिवास नार्वेकर यांच्याशी ९३२२४९२६३० किंवा ९५९४१९११९८ या क्रमांकांवर अथवा visioncreative123@gmail.com या ईमेलद्वारे संपर्क साधावा.