मराठी नाटकांमधील गाजलेली जोडी प्रशांत दामले आणि कविता लाड यांची हिंदीमधील पहिलीच मालिका ‘चंद्रकांत चिपलूनकर सीडी बम्बावाला’ सततच्या कमी टीआरपीमुळे लवकरच बंद होणार आहे. ऑगस्टमध्ये ‘सब टीव्ही’वर मोठय़ा गाजावाजामध्ये ही मालिका सुरू करण्यात आली होती. मराठीतील या यशस्वी जोडीच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकवर्ग वाहिनीकडे वळवण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता, पण प्रत्यक्षात प्रसिद्धीतंत्राचा अपुरा वापर, कलाकारांचे आणि निर्मात्यांचे उडणारे खटके अशी बरीच कारणे मालिकेच्या बंद होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
मध्यंतरी या मालिकेमध्ये वाहिनीतर्फे सुचविलेल्या बदलांनुसार निर्मात्यांकडून कथानकामध्ये फेरबदल करत असतानाच, कलाकारांना मात्र टीआरपी कमी येत असल्याने मालिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले. प्रत्येक मालिका आपले नशीब घेऊन येत असते, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद कमी असेल तर, एखादी मालिका बंद होण्याचा प्रकार कलाकारांसाठी नवीन नाही, असे मत या निमित्ताने कविता लाड यांनी व्यक्त केले. पण त्याच वेळी मालिका बंद होण्यामागे इतर कलाकारांमधील असंतोषाचे कारणही समोर येत आहे. मध्यंतरी या मालिकेच्या कथानकामध्ये ‘चिपलूनकर’ या मध्यवर्ती कुटुंबावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले होते, त्यामुळे मालिकेच्या इतर कलाकारांना आपल्या व्यक्तिरेखेकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाटत होते. म्हणूनच मालिकेतील कित्येक कलाकारांनी लवकरच मालिका सोडण्याचा निर्णय निर्मात्यांकडे बोलूनही दाखवला होता.
‘हिंदीतील पहिलीच मालिका असल्यामुळे या मालिकेकडून आमच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रीकरणाच्या पूर्वी घेतलेल्या वर्कशॉपमध्ये अनेक सांगितलेल्या गोष्टींपैकी प्रत्यक्षात कित्येकांची पूर्तता झालीच नाही. गेल्या तीन महिन्यांच्या अवधीमध्ये आमच्या वाटय़ाला फार कमी काम आले. त्यामुळे कुठेतरी आमचीही निराशाच झाली,’ असे मालिकेचे कलाकार शेखर फडके यांनी सांगितले. प्रसिद्धीच्या बाबतीतसुद्धा ही मालिका कुठेतरी कमी पडल्याचे बोलले जाते. मराठी प्रेक्षकांना जवळ आणण्याचा प्रयत्न असतानाही, महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षात या मालिकेचा फारसा प्रचार झालाच नाही, असेही कलाकार सांगतात. या सर्वाचा एकत्रित परिणाम मालिका बंद करण्यावर झाला असून येत्या १२ डिसेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रक्षेपित केला जाणार आहे. या मालिकेची जागा यमदेव आणि चित्रगुप्त यांच्यावर आधारित ‘यम है हम’ ही नवीन मालिका घेणार असून त्यामध्ये अतुल परचुरे चित्रगुप्तच्या भूमिकेमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.