राज्य नाटय़ स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रथम क्रमांकासह घवघवीत यश संपादन करणाऱ्या ‘नवोदिता’च्या ‘चिंधीबाजार’ला नवी दिल्लीतील प्रतिष्ठेच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या नाटय़ महोत्सवाचे निमंत्रण मिळाले आहे. या नाटय़ महोत्सवात देशातील चौदा उत्कृष्ट नाटकांपैकी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व ‘चिंधी बाजार’ करणार आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या महोत्सवात चंद्रपूरची विजयी पताका थेट राजधानीत फडकवण्यासाठी येथील कलावंत अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
‘नवोदिता’ ही संस्था गेली ३३ वष्रे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून राज्य नाटय़ स्पध्रेसाठी अजय धवने, आशीष अंबाडे ही जोडगोळी नाटय़निर्मिती करीत आहे. त्यांच्या नाटय़निर्मितीला दिग्दर्शिका प्रा.डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांच्या कल्पक दिग्दर्शनाची साथ मिळाली आहे. यातील अनेक नाटकांना पुरस्कारही मिळाले. त्यांनीच साकार केलेले ‘चिंधी बाजार’ हे नाटक राज्य नाटय़ स्पध्रेच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रथम आले. कामगार राज्य नाटय़ स्पध्रेच्या अंतिम फेरीतही ते पहिले आले. याच अंतिम फेरीतही त्यांना पाच पुरस्कार मिळाले. यावर्षी हे नाटक राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्य नाटय़ स्पध्रेच्या अंतिम फेरीत राज्यातून प्रथम आले. सवरेत्कृष्ट दिग्दर्शन प्रा. जयश्री कापसे-गावंडे, अभिनयाची रौप्यपदक नूतन धवने यांना मिळाले. जिल्ह्य़ाच्या सांस्कृतिक इतिहासात प्रथमच हे यश ‘नवोदिता’ने खेचून आणले. राज्यात प्रथम आल्यानंतर चिंधी बाजारच्या यशस्वी चमूला मुंबई विद्यापीठाच्या वसंत नाटय़ोत्सव या प्रतिष्ठेच्या महोत्सवात सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ३० मार्चला या नाटकाने मुंबईकरांनाही मोहीत केले. त्यानंतर आता देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रतिष्ठेच्या नाटय़ महोत्सवात सादरीकरणाचे निमंत्रण चिंधी बाजारला मिळाले आहे.
राज्य नाटय़ व कामगार नाटय़ स्पर्धा गाजविल्यानंतर येत्या सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या या नाटय़ महोत्सवात चंद्रपूरचे ४० कलावंत हे नाटक सादर करणार आहेत. त्यासाठी नाटय़ कलावंतांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली असून ते अहोरात्र परिश्रम करीत आहेत. बोहारणी जुन्या कपडय़ांऐवजी भांडी देणाऱ्या महिलावगार्ंच्या व्यथा-वेदना या नाटकात मांडण्यात आल्या आहेत. नाटय़प्रयोग अतिशय दर्जेदार व तांत्रिकदृष्टय़ा उत्कृष्ट व्हावा, यासाठी दिग्दर्शिका प्रा.डॉ.जयश्री कापसे, निर्माते अजय धवने व आशिष अंबाडे रंगमंचापासून, तर कलावंत व वेशभूषेवर बरीच मेहनत घेतली आहे. तसेच आठ ते दहा तास नियमित तालीम केली जात आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रयोगही उत्कृष्ट होईल, असा विश्वास निर्माते अजय धवने व दिग्दर्शिका प्रा.डॉ.जयश्री कापसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.