मराठी संगीतात सध्या अनोखे असे प्रयोग होऊ लागले असून एकाहून एक सरस असे संगीतकारही या संगीतसृष्टीला लाभले आहेत. झी मराठीवरील सध्या गाजत असलेल्या जय मल्हार, का रे दुरावा तसेच जयोस्तुते, माझा होशील का, या प्रसिद्ध मालिकांना तसेच सत्य सावित्री सत्यवान, हॅलो नंदन या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना उत्तम संगीत देणारा तसेच “जय मल्हार” मालिकेतील ‘बानू बया’ ह्या गाण्याला संगीत देणारा नव्या दमाचा संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र पुन्हा एकदा “चंदू शिकारी” या व्हिडीओमुळे प्रकाशझोतात आला आहे.
chandu-shikari1
MAD TARGET या नावाने युट्युबवर ए.व्ही. प्रफुल्लचंद्रने स्वतःचे असे एक चॅनेल सुरु केले आहे. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या कथानकाला अनोखे असे संगीत देऊन कलाकृती सादर करणे हे MAD TARGETचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रफुल्चंद्रने सांगितले. चित्रपटांना पार्श्वसंगीत देत असताना मला ही  अनोखी संकल्पना सुचली. अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करताना मला पूर्णपणे स्वातंत्र्य असून म्युझिक व्हिडीओ या संकल्पनेला कथानकाची जोड देऊन वर्णनात्मक संगीतातून वर्णलेली कलाकृती सादर करणे ही या मागची मुख्य संकल्पना असल्याचे त्याने स्पष्ट केले.    
“चंदू शिकारी” हा माझा पहिला व्हिडीओ गमतीदार पद्धतीने तयार करण्यात आला आहे. खरंतर शिकारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच प्राण्यांची शिकार करणारे असे चित्र उभे राहते. परंतु या व्हिडीओमधील हा “चंदू शिकारी” गमतीदारपणे शहरातील रस्त्यांवर फिरून शिकार करतो. तो कशाकशाची शिकार करतो हे तर तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल. पण हा व्हिडीओ पाहताना दिसतं तसं असतं असा विचार करून व्हिडीओ बघू नका…कारण दिसतं नसतं म्हणून जग फसतं…याचा प्रत्यय तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्की येईलच.
“मृगनयना रसिक मोहिनी” हा दुसरा व्हिडीओ सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर असून स्टायलिश, अॅक्शन सीन्सचे टेकिंग असलेला हा व्हिडीओ रसिक प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच मोहिनी घालेल अशी आशा संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी व्यक्त केली.