‘विटी दांडू’ या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीतील सुपरस्टार अभिनेता अजय देवगण मराठीत या चित्रपटाचा ‘प्रस्तुतकर्ता’ म्हणून पदार्पण करतो आहे. मात्र, या चित्रपटाचे हिंदी कनेक्शन इथेच थांबत नाही. या मराठमोळ्या चित्रपटासाठी अ‍ॅक्शनपासून व्हीएफएक्सपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या टीमने केल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश कदम यांचा हा पहिलाच चित्रपट असून हिंदीतली अनुभवी तंत्रज्ञांची टीम बरोबर असल्यानेच ‘विटी दांडू’सारखा अवघड आणि १९४७ च्या काळातली कथा रंगवणारा चित्रपट करणे शक्य झाल्याचे गणेश कदम यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.

1‘विटी दांडू’ ची कथा दोन वेगवेगळ्या कालखंडात घडते. त्याची कथा आजच्या काळातील आजोबा नातवापासून सुरू होते. मात्र, त्याचे मध्यवर्ती कथानक १९४७ च्या पाश्र्वभूमीवर घडते. त्यामुळे तो काळ उभा करायचा तर तसे चित्रिकरण स्थळ शोधण्यापासून मोठे आव्हान होते, असे कदम यांनी सांगितले. आज जागोजागी दिसणाऱ्या केबल्स, विजेच्या दिव्यांचे खांब अशा गोष्टी त्याकाळी नव्हत्या. भरपूर शोधाशोध करून आम्ही मालवणातील एका शांत आणि निर्जन स्थळ शोधले.
तरीही फ्रेममध्ये येणाऱ्या नको त्या गोष्टी दूर करणे, दोन कालखंडातील फरक दाखवण्यासाठी वापरलेले कलर टोन या तांत्रिक गोष्टी महत्त्वाच्या होत्या. त्याचबरोबर आजच्या पिढीतला शहरात राहणारा, पायाला माती लागली म्हणून रडणारा मुलगा गावात येतो तेव्हा तो आणि त्याच्याबरोबरचे प्रेक्षकही गावाच्या प्रेमात पडतील अशा फ्रेम्स करणे या सगळ्या गोष्टींसाठी हिंदीतील या अनुभवी टीमचे मोलाचे सहकार्य झाल्याचे ते पुढे म्हणाले.
चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक आणि ब्रिटिशांमध्ये होणारे युध्द असेल, लहान मुलांची मारामारी असेल अनेक प्रकारचे स्टंट्स ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटासाठी फाइटमास्टर म्हणून काम केलेल्या सुनील रॉड्रिक्स यांनी केले आहेत.
सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले सुरेंद्र ढवळे, कॅमेरामन शैलेश अवस्थी यांच्यापासून ते व्हीएफएक्सचे काम पाहणारी संपूर्ण टीम ‘चेन्नई एक्स्प्रेस’सारख्या हिंदी चित्रपटासाठी काम करणारी टीम होती, असे कदम यांनी सांगितले.
या टीमचा व्यावसायिक अनुभव इतका जबरदस्त होता की रात्री चर्चा के ल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक शॉट्स लागायचे. कुठेही एखादी गोष्ट मिळाली नाही अशा क्षुल्लक गोष्टींमुळे चित्रिकरण रखडले नाही, असेही त्यांनी सांगितले.
या चित्रपटाचा कथालेखक आणि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून अभिनेता विकास कदम यांनी काम पाहिले आहे. केवळ प्रस्तुतकर्ता म्हणून अजय देवगण नाही तर संपूर्ण हिंदी चित्रपटांसाठी काम करणाऱ्या व्यावसायिक टीमच्या मदतीने ‘विटी दांडू’ सारखा मराठमोळा चित्रपट साकारला आहे.