छोट्या दोस्तांसाठी डिस्नेच्या जादुई दुनियेची सफर घरबसल्या करता आली तर.. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या असून बच्चेकंपनीच्या आवडी-निवडी जपत झी टॉकीजने ही आगळी-वेगळी संकल्पना राबवली आहे. झी टॉकीज वाहिनी अॅनिमेशनजगतातल्या काही निवडक लोकप्रिय चित्रपटांचा खजिना मराठीत घेऊन आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातल्या गाजलेल्या कॅरेक्टरसाठी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंतांनी आवाज दिला आहे. डिस्ने चित्रपट महोत्सवाच्या प्रारंभी ३ मे ला या डिस्नेकुटुंबातला‘द लायन किंग’ हा धमाल सिनेमा सर्वांच्या मनोरंजनासाठी येणार आहे.
‘द लायन किंग’, ‘फाईंडिंग निमो’, ‘सिंड्रेला’, ‘ब्युटीअॅण्ड द बिस्ट’, ‘ब्रेव्ह’, ‘अप’ आणि ‘वॉल-इ’ अशा सात गाजलेल्या अॅनिमेशनपटाची मेजवानी लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांनाच घेता येणार आहे. महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे, केतकी माटेगावकर, अपेक्षा दांडेकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी लहानग्यांच्या या आवडीच्या सिनेमांना आवाज देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे. कलाकार मंडळी स्वतः डिस्ने अॅनिमेशन चित्रपटाचे चाहते असल्यामुळे प्रत्येकाने तितक्याच उत्साहाने झी टॉकीजच्या या नव्या प्रयोगाला साथ दिली.
‘द लायन किंग’ या चित्रपटाला महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे यांनी आवाज दिला आहे तर ‘सिंड्रेला’ या चित्रपटात केतकी माटेगावकरचा आवाज ऐकायला मिळेल. या अॅनिमेटेड फिल्म्सचा आस्वाद येत्या ३ मे पासून दर रविवारी दुपारी १२ वाजता आणि पुनः प्रसारण सायंकाळी ६ वाजता पाहता येईल. डिस्ने चित्रपटांचा हा महोत्सवछोट्या पडद्यावर चांगलीच धमाल करेल. झी टॉकीजवर दाखवण्यात येणाऱ्या डिस्ने आणि डिस्ने पिक्सार चित्रपट महोत्सवामुळे बच्चेमंडळी व त्यांचे पालक फूल टू धमाल करणार आहेत
दाखवण्यात येणारे हे सात सिनेमे निव्वळ मनोरंजन करणारे नाहीत, तर या प्रत्येक चित्रपटांमधून मौलिक संदेश ही दिला गेला आहे. ‘वॉल-इ’ या सिनेमातून पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरू पाहणाऱ्या माणसाला जागं करणारं वास्तव दाखवलं आहे. निमो’ ह्या सिनेमात माशाच्या प्रवासाचं नाट्य रंगवलं आहे. या चित्रपटातून समुद्र विश्वाचं अफलातून दर्शन घडेल.
३ मे ते ३१ मे दरम्यान डिस्नेचे हे धमाल चित्रपट दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६वाजता प्रक्षेपित केले जाणार आहेत.