‘अब तो तुम्हे फाँसीही होगी’.. गुन्हेगाराला पोलिसांनी असे म्हटल्यावर त्या खोलीमध्ये गंभीर वातावरणाऐवजी कोणीतरी जेवणाच्या सोयीसाठी धावपळ करण्याची सुरुवात करतोय, कोणी एखाद्याची फिरकी घेण्याच्या तयारीतच उभा आहे, असं काही होत असेल तर.. विरोधाभास असला तरी असं वातावरण गेली अठरा र्वषे ‘सीआयडी’च्या सेटवर कायम आहे. एसीपी प्रद्युम्न, अभिजीत, दया ही पात्रं आणि त्यांच्या तोंडचे संवाद पाठ असलेली एक अख्खी पिढी गेली अठरा वर्ष नित्यनियमाने ‘सोनी टीव्ही’वर  ‘सी.आय.डी’ ही मालिका पाहते आहे. सोशल मीडियावर तर जितके या मालिकेचे चाहते आहेत तितकेच त्यांच्यावर खिल्ली उडवणारे, विनोद करणारेही आहेत. इतकी वर्ष एकच टीम कुठल्याही वादविवादात न पडता काटेकोरपणे काम करत असेल तर त्यांच्यात नक्कीच काहीएक रसायन असणार. आणि इतकी वर्ष टिकून राहिलेलं हे मैत्रीचं, सहकार्याचं रसायन नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी ‘सीआयडी’चे तीन शिलेदार शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांना गाठलं. त्यांच्या गप्पांमधून मैत्रीचा एक वेगळाच पैलू उलगडला गेला.

शिवाजी साटम म्हणजे ‘सीआयडी’चे हुकमी शिलेदार. इतकी वर्ष मालिकेचे हजारो भाग पूर्ण केल्यावरही त्यांना क्रॉफड मार्केटला रात्रीच्या अंधारामध्ये केलेला पहिला सीन अस्खलित आठवतोय. त्यानंतर पुलाखालून पुष्कळ पाणी गेलं आहे. मालिका सुरू केली तेव्हा पुढची किमान दोन ते तीन वर्षे या मालिकेला कोणीच धक्का लावू शकणार नाही, याची आपल्याला खात्री होती असं ते सांगतात. पण,  कधी या तीन वर्षांचे गुणिले सहा झाले हे मात्र अजूनही आपल्याला कळलेलं नाही. १९९८ ला लोखंडवालामध्ये चित्रित केलेला पहिला शॉट दयानंदलाही आठवतोय. अर्थात, आता एक-दोन वर्षांमध्ये कलाकारांना मालिकेचा कंटाळा येतो. पण, या मालिकेबाबत ‘कंटाळा आलाय’ हे वाक्य इतकी वर्ष कामं करूनही या तिघांच्या मुखी नाही, हे विशेष. अर्थात ‘इसके पिछे का राज’ आमची ‘निखळ मैत्री’ असं ते सांगतात. ‘तुम्ही मैत्रिणी नाही का, एकत्र भेटल्यावर मस्त गप्पांचा फड रंगतो, तसंच होतं इथे सेटवर,’ असं साक्षात शिवाजी साटम यांनी म्हटल्यावर शंका उपस्थित करण्याचं कारणच उरत नाही.
म्हणायला शिवाजी साटम हे या टीममधील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी कलाकार. पण, सेटवर आल्यावर वयाचं भानच राहत नसल्याचं ते सांगतात. ‘अगं, काय सांगू आमच्यातलं बालपण अजून संपलेलंच नाही,’ हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर निरागस भाव दिसून येतो. ‘सीआयडी’चा सेट म्हणजे गप्पा, मजा-मस्करीचा अड्डा हे समीकरण सर्वज्ञ आहे. मग कधी दयानंद प्रसादाच्या नावाखाली सेटवर सर्वाना तुरटी खायला घालतो, तर कधी सेटवरच्या स्पॉटबॉयच्या वाढदिवसालाही केक कापला जातो. मजा करण्याचं एकही कारण वाया गेलेलं त्यांना चालत नाही. पण, दरवेळी आळ मात्र दयानंदवरच येतो. ‘मी इथे केवळ एक टारगेट आहे. काही झालं की दयाचं नावं घ्यायची यांना सवय झाली आहे,’ असं साळसूदपणे सांगणारा दया स्वत: फेक कॉल्सना फॅ ड्रीचा नंबर देतो, हे सांगताना मात्र चोरी पकडली गेल्याचा आव आणतो. ‘कितीही मस्करी केली तरी प्रत्येकाला आपापल्या मर्यादा माहीत आहेत,’ हे तिघंही मान्य करतात. हेवा वाटावा अशी टीम असूनही ‘आम्हाला कोणाची दृष्ट लागूच शकत नाही,’ हेही शिवाजी साटम ठामपणे सांगतात. प्रत्येक सेटवर एकतरी खवय्या असतोच, तसा इथे दयानंद आहे. सेटवर कोणाला कधी काय हवं आहे, याची बित्तंबातमी त्याच्याकडे असते. सेटवर जेवण आलं नाही, तर प्रत्येकाच्या आवडीचा मेनू तो स्वत: मागवतो, हे शिवाजी साटम आणि आदित्य दोघंही मान्य करतात. अर्थात त्यामागे एकतर तो शेट्टी त्यात त्याचे पूर्वी हॉटेलही होते, हे कारण असल्याचंही ते मिश्किलपणे सांगतात.
 मालिकेचा चाहतावर्ग किती आहे, हे वेगळे सांगण्याची कुणालाच गरज नाही. पण, त्यातही आपण सिग्नल तोडल्यावर पावती फाडण्याऐवजी पोलीस आपल्याला फोटो काढण्याची विनंती करतात तेव्हा थक्क व्हायला होत असल्याचे शिवाजी साटम सांगतात. चाहत्यांनी या मालिकेची, पात्रांची, त्यांनी सोडविलेल्या केसेसची सगळी माहिती असलेलं एक पुस्तकही बनवलं असल्याचं दयानंद सांगतो. पण, त्यांना सर्वात जास्त कौतुक आहे ते लहानग्या चाहत्यांचे. ‘काय कळतं त्यांना मालिकेतलं? गुन्हा करणारी आणि सोडवणारी मोठी माणसं. त्यांच्या क्लृप्त्या त्यांना कळत नाही. पण, ज्याअर्थी हे चोराला पकडतात, म्हणजे ते हिरो आहेत. ही त्यांची मान्यता असते,’ असं साटम सांगतात. त्यांच्यातील निरागसता मनं जिंकत असल्याचं तिघेही मान्य करतात. निरागसतेसोबत सोशल मीडियावर त्यांच्यावर केलेल्या विनोदांची देणगीही त्यांना मिळालेली आहे. त्याबद्दल शिवाजी साटम सांगतात, ‘कसली विचारशक्ती आहे या तरुण पिढीत. त्यांच्या विनोदांमधून त्यांच्या गमतीशीर चित्रांमधून त्यांची कल्पनाशक्ती दिसून येते.’
 इतकी वर्ष झाली, काळाप्रमाणे माणसं, तंत्रज्ञान बदलत जातात. इथेही तो बदल जाणवू लागला आहे. मालिकेत तर आम्ही प्रत्येक नवीन गोष्ट सातत्याने आणण्याचा प्रयत्न करतोच. पण, कामातही हा बदल आम्हाला जाणवल्याचं ते सांगतात. ‘खरं सांगू का, तू हसू नकोस, आधी सेटवर ज्याच्याकडे स्कू टर असायची त्याच्या पाठीमागे एकजण त्याचा कॉस्च्युम, दोन खोकी अशा अवतारात सेटवर यायचा. आता प्रत्येकजण त्याच्या गाडीने येतो. प्रत्येक गोष्ट आमच्या हाताशी हजर असल्याचे,’ शिवाजी साटम सांगतात. हे सर्व असूनही मध्येच कुठूनतरी शिवाजी साटम मालिका सोडणार असल्याची बातमी येते, ‘मग ते काय असतं?’ हे विचारण्याची हिम्मत मी एकटवलीच. ‘ती प्रसिद्धीचं गिमिक असतं गं.. प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी,’ हे सांगताना जोपर्यंत ‘सीआयडी’ आहे तोपर्यंत ‘एसीपी प्रद्युम्न’ असणारच, हे आश्वासनही ते देतात.