‘जीईसी’ विश्वात नव्याने दाखल झालेल्या ‘अँड टीव्ही’ने वेगवेगळ्या मालिकांद्वारे आपले बस्तान बसवले आहे. एकाच वाहिनीवर मनोरंजनाचे सगळेच पर्याय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे ही वाहिन्यांची गरज बनली आहे. याला ‘अँड टीव्ही’ अपवाद नाही. दोन नवीन मालिका वाहिनीने प्रेक्षकांसाठी आणल्या असून या दोन्ही सध्या लोकप्रिय असलेल्या संकल्पनांवर आधारित मालिका आहेत. ‘डील ऑर नो डील’ हा शो गेम शोच्या धर्तीवर आहे, तर क्राइम शोजना असणारी मागणी लक्षात घेऊन वाहिनीने ‘एजंट राघव’ हा शो आणला आहे. या दोन नवीन शोजच्या निमित्ताने टेलिव्हिजन विश्वातले दोन मोठे चेहरे वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत. अभिनेता रोनित रॉय हा ‘डील ऑर नो डील’ या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे, तर आतापर्यंत छोटय़ा पडद्यावर ‘लय भारी’ कामगिरी केलेला अभिनेता शरद केळकर ‘एजंट राघव’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘डील ऑर नो डील’ हा फॅ मिली गेम शो आहे. आंतरराष्ट्रीय शोचे भारतीय अवतार असलेल्या या शोमध्ये अख्खे कुटुंब सहभागी होणार असून त्यांच्यापैकी एकाला एक कोटी रुपये जिंकण्याची संधी या शोतून मिळणार आहे. रोनित रॉयचे सूत्रसंचालन हे या शोचे आणखी वैशिष्टय़ ठरेल. ‘मला स्वत:ला कित्येक दिवसांनी या शोच्या निमित्ताने लोकांसमोर रोनित रॉय म्हणून वावरायला मिळणार आहे, याचा खूप आनंद झाला आहे’, असे रोनितने या शोविषयी बोलताना सांगितले. पहिल्यांदाच शोच्या स्पर्धकांबरोबर त्यांच्या कुटुंबाशीही संवाद साधत त्यांना खेळात सहभागी करून घेण्याची जबाबदारी सूत्रसंचालक म्हणून माझ्यावर आहे आणि हा प्रकार नवा असल्याने अर्थातच आव्हानात्मकही आहे आणि एकाच वेळी छान अनुभव देणारा असल्याचे रोनितने सांगितले. तर ‘एजंट राघव’च्या निमित्ताने कधीकाळी जे क्राइम शोज मी आवडीने आणि न चुकता पाहत होतो, आज त्याच शोचा मुख्य नायक, गुन्हय़ांमागचे रहस्य उलगडणाऱ्या एजंट राघवची भूमिका मला करायला मिळते आहे. हा माझ्यासाठी छान अनुभव आहेच, पण माझ्या चाहत्यांनाही मला या वेगळ्या अवतारात पाहायला आवडेल, असा विश्वास रोनित रॉयने व्यक्त केला आहे. ‘द व्हॉइस ऑफ इंडिया’ या आमच्या शोमुळे खरे म्हणजे ‘अँड टीव्ही’ला चांगलेच बळ मिळाले आहे. या शोला लोकांनी उचलून धरले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळ्या संकल्पनांवरचे आणखी दोन नवीन शो प्राइम टाइम स्लॉटमध्ये आणून प्रेक्षकांना नवे काही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘डील ऑर नो डील’ हा मुळातच फॅ मिली गेम शो असल्याने आणि ‘एजंट राघव’ हा असाही कुटुंबांमध्ये आवडता जॉनर आहे. त्यामुळे या दोन्ही शोमुळे घराघरांतील प्रेक्षक जोडले जाऊ शकतील या विश्वासाने हे दोन नवीन शोज सुरू केले असल्याची माहिती वाहिनीचे व्यवसायप्रमुख राजेश अय्यर यांनी दिली.