मुख्य प्रवाहात येऊ न शकलेल्या दर्जेदार, आशयघन चित्रपटांनाही सामावून घेत गोदरेज एक्स्पर्ट रीच क्रीम सह्य़ाद्री सिने पुरस्कारांनी आपले वेगळेपण राखले आहे. सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवीत चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाने यंदाच्या सह्य़ाद्री सिने पुरस्कार सोहळ्यावर आपली मोहोर उमटवली.
मराठी चित्रपटांच्या नावीन्यपूर्ण कथा आणि त्यांची सुरेख मांडणी यामुळे मराठी चित्रपटसृष्टीने स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. सर्वात मोठय़ा चित्रपटसृष्टीपैकी एक असलेल्या आणि दरवर्षी अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान करणे हा या सोहळ्यामागचा खरा उद्देश असल्याचे मुंबई दूरदर्शन केंद्राचे अप्पर महासंचालक मुकेश शर्मा यांनी सांगितले.
सहाव्या सह्य़ाद्री सिने पुरस्कार सोहळ्यात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘कोर्ट’ चित्रपटाला, सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘किल्ला’ या चित्रपटासाठी अविनाश अरुण यांना देण्यात आला. ‘लोकमान्य एक युगपुरुष’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावेला ज्युरी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोत्तम नायकाचा पुरस्कार ‘लय भारी’ चित्रपटासाठी रितेश देशमुखला देण्यात आला. तर एलिझाबेथ एकादशी या चित्रपटासाठी अभिनेत्री नंदिता धुरी हिला सर्वोत्तम नायिकेचा पुरस्कार देण्यात आला. ‘कोर्ट’ चित्रपटासाठी लक्षवेधी अभिनेता पुरस्कार विवेक गोम्बर यांनी तर ‘एक हजाराची नोट’ या चित्रपटासाठी लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार उषा नाईक यांनी स्वीकारला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे यांनी केले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे यांनी केले. या सोहळ्याचे प्रसारण १२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता डीडी सह्य़ाद्री वाहिनीवर करण्यात येणार आहे.