विविध प्रकारच्या चित्रपटांची मांडणी मराठी चित्रपटांमध्ये होताना सध्या दिसते. कौटुंबिक-विनोदी अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या मराठीत खूप असताना सध्याच्या काळात निरनिराळे विषय हाताळणारे चित्रपट अधिक येताना दिसतात. ‘शटर’ हा रूढार्थाने किंचित रहस्यमय आणि थरार दाखविणाऱ्या प्रकारचा चित्रपट असला तरी त्यातही माणसांचे मनोव्यापार दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. आपल्या मनाच्या कप्प्यात असंख्य भावभावनांचा विचार सतत घोळत असतात. पण साऱ्याच काही उघडय़ा होत नाहीत. पण असा एखादा क्षण येतो आणि त्यांना पाय फुटतात. मग एक बंद शटर खुले होते. अर्थातच शटरच्या आतमधल्या अस्वस्थतेपेक्षा बाहेरची अस्वस्थता अधिक सुन्न करणारी असते. असाच काहीसा विचार देत मांडण्याचा प्रयत्न शटरमध्ये दिसून येतो. सहसा साध्या वाटणाऱ्या घटनाप्रसंगांमधून पटकथेची मांडणी करत प्रेक्षकांना उत्कंठावर्धक चित्रपट दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न लेखक-दिग्दर्शकांनी केला आहे.
मूळ मल्याळी चित्रपटाचा हा रिमेक आहे. पण केवळ आहे त्या साच्यातून काढलेला अजिबात नाही. मध्यमवयीन अशा उच्च मध्यमवर्गातील जित्याभाऊ जहाजावरील नोकरीतल्या सुट्टीत घरी आलेला असतो. मित्रांबरोबर मौज मस्ती, कॉलेजला जाणाऱ्या मुलीच्या लग्नाचा विषय, घरातली कामं अशा अनेक गोष्टी सुरू असतात. एका रात्री मित्रांबरोबर मद्य जरा जास्तच झाल्यावर नेमका जित्याभाऊ घसरतो आणि वेश्येला घेऊन चार हॉटेलच्या धडका मारतो. अखेरीस काहीच न झाल्यामुळे त्याच्या मालकीच्या बंद शटरच्या गाळ्यात येतो. वेश्येला भूक लागते म्हणून जित्याभाऊचा रिक्षावाला मित्र एक्या त्या दोघांना दुकानाच्या गाळ्यात ठेवून कुणी पाहू नये म्हणून बंद शटरला कुलूप लावून जेवण आणायला जातो. काहीच वेळात एक्या येईल असे वाटत असतानाच शटरच्या बाहेरील दुनियेत छोटय़ा-छोटय़ा गोष्टी घडत जातात आणि त्यात एक्या अडकतो. शटर उघडायला पोहोचू शकत नाहीत. मध्यंतरानंतर कथानक वेग पकडते. आता काय होणार, पकडणार का, की कोणाचा खून होणार की अन्य काही..याचे कुतूहल वाढत जाते.
बंद शटरच्या गाळ्यात अडकल्यानंतर सहजपणे बाहेरच्या दुनियेतील आपल्या ओळखीचे लोक, मित्र यांचे आपल्याविषयी खरे मत काय आहे, ज्यांच्याशी आपले पटत नाही असे लोक आपल्याविषयी काय बोलतात, आपण एका विचित्र परिस्थितीत अडकल्यानंतर हतबल झालो आहोत आणि अशावेळी आपल्या बायकामुलांना काय वाटत असेल असे सारे विचार नायक जित्याभाऊ करत राहतो. त्यातून त्याला जगातील बऱ्यावाईटाची ओळखही होत जाते. यातल्या नायकासमोरच्या प्रश्नांशी, चित्रपटातील घटनांशी प्रेक्षकाचा थेट संबंध आहे. कारण या चित्रपटातली प्रत्येक गोष्ट आपल्याबाबतही घडू शकेल असे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. पुढे काय होणार याचा अंदाज करत असताना प्रेक्षकासमोर अनपेक्षित गोष्टी येत जातात. त्याची उत्कंठा वाढत राहते.
बंद शटरच्या गाळ्यात जित्याभाऊ-वेश्या असे दोघेजण अडकलेले असताना अन्य व्यक्तिरेखांचे प्रसंग बाहेर घडतात. जित्याभाऊचे मित्र, त्याच्या शेजारच्या गाळ्याचा मालक, जित्याभाऊची बायको, मुली यांचे आयुष्य, जित्याभाऊच्या मित्रांचा जित्याभाऊकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक गोष्टी जित्याभाऊला शटर बंद असलेल्या गाळ्यात अडकून पडल्यानंतर समजतात.
अत्यंत मोजक्या चित्रीकरणस्थळी केलेला चित्रपट आहे. बऱ्यापैकी छायालेखन, प्रभावी अभिनय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथानकाची जबरदस्त पकड या चित्रपटात आहे. मूळ कथालेखन प्रभावी आहेच, परंतु त्यावर बेतलेल्या पटकथा-संवाद लेखन लेखिकेनेही ताकदीने केले आहे. सचिन खेडेकर यांनी जित्याभाऊ ऊर्फ जितेंद्र हा नायक अतिशय बारकावे दाखवत चोख पद्धतीने साकारला आहे. सोनाली कुलकर्णीने साकारलेल्या वेश्येच्या व्यक्तिरेखेला असलेल्या छटा आपण नेहमी हिंदी सिनेमात पाहतो त्यापेक्षा खूप निराळ्या आहेत. त्या छटा संयतपणे तिने दाखविल्या आहेत. जित्याभाऊचा रिक्षावाला मित्र एक्या ही भूमिका अमेय वाघनेही खूप छान पद्धतीने दाखवली आहे. नेटके दिग्दर्शन, उत्तम अभिनय असला तरी संकलनात गडबड झाल्याचे काही प्रसंगातून समजते. मात्र उत्कंठावर्धक घटना-प्रसंगांच्या मांडणीमुळे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो.

शटर
निर्माते – संजीव एम. पी. प्रकाश बारे
दिग्दर्शक – व्ही. के. प्रकाश
मूळ कथा – जॉय मॅथ्यूज
पटकथा – संवाद – मनीषा कोर्डे
छायालेखक – के के मनोज
संकलक – भक्ती मायाळू
संगीत – पंकज पडघन
कलावंत – सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, प्रकाश बारे, कमलेश सावंत, अमेय वाघ, राधिका हर्षे, जयवंत वाडकर, अनिरुद्ध हरिप, कौमुदी वालोकर, विद्या पटवर्धन, साहील कोपर्डे, ललित सावंत व अन्य.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
loksatta analysis ai based system to reduce human wildlife conflict in tadoba andhari tiger reserve
विश्लेषण : ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ नेमके काय करणार?
Rashmi Shukla
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घ्या; महासंचालकांचे आदेश