लेडी गागा, टेलर स्विफ्ट आणि ‘सालाबादप्रमाणे यंदाही’ थाटात ग्रॅमी पुरस्कारांवर हमखास मोहोर  उमटविणाऱ्या अमेरिकी महारथींची सद्दी रविवारी झालेल्या यंदाच्या ५६ व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये संपुष्टात आल्याचे चित्र होते. फ्रान्सचे डाफ्ट पंक संगीतयुगूल आणि न्यूझीलंडची १७ वर्षीय ललना लॉर्ड हिने संगीतातील सर्वोच्च समजले जाणारे सर्व पुरस्कार खिशात घातले. फ्रान्सच्या डाफ्ट पंक  या टोपण नाव घेतलेल्या संगीतकार जोडीच्या ‘रँडम अ‍ॅक्सेस मेमरीज’ या अल्बमला सवरेत्कृष्ट अल्बमचा पुरस्कार मिळाला. त्यांच्याच ‘गेट लकी’ या संगीत ट्रॅकला यंदाच्या वर्षांतील सर्वात चांगली संगीत रेकॉर्ड (दृकश्राव्य फीत) म्हणून पुरस्कार मिळाला. फॅरेल विल्यम्स यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे फ्रान्सला दुहेरी यश तर मिळाले आहेच, शिवाय डाफ्ट पंक यांना या वर्षी एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. डाफ्ट पंक जोडीने एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार पटकावून फ्रान्सचे वर्चस्व सिद्ध केले. न्यूझीलंडच्या सतरा वर्षीय गीतकार व गायिका लॉर्ड हिने वर्षांतील उत्तम गाणे व वर्षांतील एकाच कलाकाराची उत्कृष्ट कामगिरी यासाठी रॉयल या अल्बमच्या माध्यमातून दोन ग्रॅमी पुरस्कार पटकावले.

भारताचे चित्र
 दिवंगत रविशंकर यांना गेल्या वेळी द लिव्हिंग रूम सेशन्स पार्ट २ या संगीत अल्बमसाठी नामांकन मिळाले होते, पण त्यांना या वेळी ग्रॅमी पुरस्कार मिळाला नाही. याच प्रवर्गात त्यांना गेल्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. रविशंकर यांना गेल्या वेळी ग्रॅमी पुरस्काराच्या वेळी खास कार्यक्रम सादर करून श्रद्धांजली वाहण्यात आली होती.

डाफ्ट पंक यांच्याविषयी थोडे..
डाफ्ट पंक हे या संगीत अल्बमकर्त्यांचे टोपण नाव असून, त्यांचे खरे नाव गाय मॅन्युअल द होमेम ख्रिस्तो व थॉम्सल बगाल्टर असे आहे. त्यांच्या अल्बमची निवड सर्वात चांगला संगीत अल्बम म्हणून झाली आहे, तर त्यांच्याच  रेकॉर्डची निवड पॉप डय़ुओ – ग्रुप परफॉर्मन्स, उत्कृष्ट नृत्य  व उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक अल्बम या गटात झाली आहे. उत्कृष्ट अभियांत्रिकी अल्बम व नॉन क्लासिकल गटात अल्बमची निवड झाली आहे.

इतर पुरस्कार
सियाटलमधील रॅपर जोडीने चार पुरस्कार पटकावले असून त्यात उत्कृष्ट नव कलाकार व उत्कृष्ट रॅप अल्बम यासाठी ‘द हीस्ट’ची, तर उत्कृष्ट रॅप गीत व कामगिरीसाठी ‘थ्रिफ्ट शॉप’ची निवड झाली आहे. जे झी यांना नऊ प्रवर्गात नामांकन मिळाले होते. त्यांनी जस्टिन टिंबरलेक यांच्या मदतीने केलेल्या ‘होली ग्रेल’ला  उत्कृष्ट रॅप व नृत्य सादरीकरणाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. रिहाना यांना उत्कृष्ट शहरी समकालीन अल्बम अनअ‍ॅपोलेजेटिकसाठी, तर नवकलाकार कॅसे मूसग्रेव्हज यांच्या सेम ट्रेलर डिफरंट पार्क या अल्बमला उत्कृष्ट देशी संगीताचा पुरस्कार मिळाला. ब्रुनो मार्स यांना पॉप गायनाच्या अनऑर्थोडॉक्स या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. दृश्य माध्यमासाठी उत्कृष्ट गीतलेखनाचा पुरस्कार ब्रिटिश गायक अ‍ॅडेल यांना स्कायफॉलमधील गीतासाठी मिळाला. उत्कृष्ट रॉक गीताचा पुरस्कार डेव्ह ग्राएल व पॉल मॅकार्टनी, क्रिस्ट नोवेसेलिक व पॅट स्मिअर यांना कट मी सम स्लॅक या गीतासाठी मिळाला. मॅकार्टनी यांना बेस्ट बॉक्स्ड व लिमिटेड एडिशन प्रवर्गात विंग्ज ओव्हर अमेरिका या अल्बमसाठी, तर उत्कृष्ट पाश्र्वध्वनीसाठी त्यांच्या लाइव्ह किसेसला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. ब्लॅक सबाथ यांना गॉड इज डेड या अल्बमसाठी बेस्ट मेटल परफॉर्मन्स प्रवर्गात ग्रॅमी पुरस्कार मिळाला.