दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची घोषणा गुरूवारी करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, पं.सुरेश तळवलकर, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर या पाच दिग्गजांना यंदाचा दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. आदिनाथ मंगेशकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती दिली. यावेळी उषा मंगेशकर, सुधीर गाडगीळ, अविनाश प्रभावळकर, विनीत गोरे, रवी जोशी देखील उपस्थित होते. पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार २४ एप्रिल रोजी सायं. ४ वाजता मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार असून यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे देखील उपस्थित असणार आहे. तर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह व प्रत्येकी १ लाख १ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.