उत्कृष्ट मराठी चित्रपट निर्मितीसाठी प्रख्यात असलेली तिगडी चंद्रकांत कुलकर्णी, अजित दळवी आणि प्रशांत, पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना अनोख्या चित्रपटाची मेजवानी देण्यास सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘आजचा दिवस माझा’नंतर आता ही तिगडी `दुसरी गोष्ट’ नावाने आणखी एक सशक्त राजकीय कथानक घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. हा चित्रपट १ मे २०१४ रोजी राज्यातील १७२ चित्रपटगफहात प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकात कुलकर्णी यांनी केले असून कथा-पटकथा संवाद अजित आणि प्रशांत दळवी यांचे आहेत. जातीपातीने लगडलेल्या समाजातील एका खालच्या जातीतील मुलाची कथा चित्रपटात सशक्तपणे मांडण्यात आलेली आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून चोऱया करणाऱया या मुलाला शिक्षणाचे महत्व कळून येते. त्यानंतर तो शिक्षण घेणे सुरू करतो आणि कठोर मेहनतीने यशाच्या पायऱया चढत जातो. कथानायकाच्या जीवनातील चढ-उतार या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. `दुसरी गोष्ट’मध्ये संवेदनशील मुद्यांवरही भर देण्यात आलेला आहे. कथेत अनेक नाटकीय वळणे आणि ट्विस्ट एकाच वेळेस पाहण्यास मिळणार आहे. कथा नायकाला उच्च पदावर पोहोचण्यासाठी मदत करणाऱयांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. एकीकडे कथानायक देशासाठी काहीतरी करण्यासाठी धडपडत असतो, तर दुसरीकडे एका दलित नेत्याला मुख्यमंत्री होण्यासाठी ५० वर्षे वाट पहावी लागते हे सत्यही समोर येत असते. कट-कारस्थाने प्रत्युत्तर, हेवेदावे, प्रेम-द्वेष ही राजकीय जीवनातील सत्यता या निमित्ताने समोर येते. त्याचवेळेस एक वेगळय़ा स्तरावरील संबंधांची गहरी जाणीवही स्पष्ट होऊ लागते. त्यामुळे नायकाची कथा पुढील पिढीसाठी एक सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणून मांडली जाते. मेहनतीला पर्याय नाही तसेच सकारात्मकताच व्यक्तीला उच्च पदापर्यंत घेऊन जाऊ शकते असा संदेश हा चित्रपट देतो. `दुसरी गोष्ट’मध्ये प्रोत्साहित करणारी नायकाची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले साकारत असून त्यांच्या तरुणपणाची भूमिका सिद्धार्थ चांदेकरने साकारली आहे.