क्रिकेट हा भारतीयांचा आत्मा आहे आणि टीव्ही म्हणजे जीव की प्राण. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन मॅरिनेटिंग फिल्म्स आणि बालाजी टेलीफिल्म्स यांनी एकत्र येऊन ‘बॉक्स क्रिकेट लीग’ या भारतातील पहिल्या खेळावर आधारित रिअ‍ॅलिटी शोचे आयोजन केले आहे. छोटय़ा पडद्यावर नवनवे ट्रेंड आणण्यात उस्ताद असलेल्या एकता कपूरने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वाला खेळाच्या मैदानात उतरवत नवा ट्रेंड सुरू केला आहे.
 ‘बीसीएल’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून १२० टीव्ही कलाकारांचे आठ गट क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत. ‘बॉक्स क्रिकेट लीग’मधील हे सामने १४ ओव्हर्समध्ये खेळवले जातील. प्रत्येक गटाचे ‘ए’ आणि ‘बी’ असे विभाजन करण्यात येणार आहे. या दोन गटांमधील होणाऱ्या सामन्यांमधून चार विजेत्या संघांची निवड करण्यात येईल. या चार संघांमध्ये अंतिम सामने रंगतील आणि त्यातून विजेत्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
या सामन्यांना ‘फिल्मी’ अंदाज देण्यासाठी नेहमीच्या ‘टॉस’ना ‘जय-वीरू’ आणि ‘बसंती-धन्नो’ ही नावे देण्यात आली आहेत. तर ग्लॅमर वाढवण्यासाठी इथे चिअर गर्ल्सची जागा  ‘बीसीएल तितलीज’नी घेतली आहे.
‘बीसीएल तितलीज’ म्हणून छोटय़ा पडद्यावर हॉट ठरलेल्या नूरीन शहा, वृशिका मेहता यांचा समावेश असणार आहे. हे सामने लवकरच सोनी टीव्हीवर पाहता येणार आहेत आणि त्यासोबतच कॅमेऱ्यामागच्या आणि लॉकर रूममधील गमतीजमती, भन्नाट अवॉर्ड्स यांची मजासुद्धा प्रेक्षकांना लुटता येणार आहे.