बायकोच्या हातचे जेवण आवडत नाही इथपासून ते नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही अशा वेगवेगळ्या कारणांसाठी घटस्फोटांच्या निर्णयाप्रत येऊन ठेपलेल्या तरूण जोडप्यांची संख्या आज फार मोठी आहे. आपले नाते तुटेपर्यंत ताणले जात असताना एकत्र येण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक असतात. पती-पत्नीमधील संवादच हरवून जाण्याआधी नव्याने संवाद साधण्याची एक संधी द्यायला हवी, या विचाराने ई टीव्ही मराठीवर ‘एक संधी अजूनही’ नावाचा नविन शो दाखल होतो आहे.
घटस्फोट घेऊ इच्छिणारी जोडपी, त्यांच्यातल्या विसंवादाची कारणे शोधण्याचा प्रयत्न या शोमधून केला जाणार आहे. एका वास्तव घटनेचे नाटय़रूपांतरण, त्या घटनेतील संबंधित पती-पत्नींमध्ये आलेल्या दुराव्याची कारणे शोधण्याचा तज्ञांचा प्रयत्न, त्यावर त्यांची चर्चा आणि यातून मार्ग कसा काढता येईल यावर समुपदेशकांनी सुचवलेला सल्ला अशा तीन टप्प्यात हा शो सादर होणार असून अभिनेत्री भार्गवी चिरमुले या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोमध्ये सामाजिक कार्यकर्त्यां वर्षां पवार-तावडे, समुपदेशक वंदना कुलकर्णी, मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर काम करणाऱ्या डॉ. शुभा, कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश बागेश्री पारेख आणि कुटुंब न्यायालयातील समुपदेशक अक्षता तुलावार अशी तज्ञ मंडळी या शोच्या समितीवर असून प्रत्येक घटनेवर चर्चा करून योग्य तो दिशा दाखवण्याचे काम ही समिती करणार आहे. मराठी मनोरंजन वाहिन्यांवर पहिल्यांदाच असा वेगळा प्रयत्न या शोच्या माध्यमातून केला जाणार आहे.