‘नच बलिये’च्या यंदाच्या पर्वामध्ये लेखक चेतन भगत या स्पर्धेमध्ये परीक्षक असल्याच्या बातमीची चर्चा सर्वाधिक झाली. ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये मिथुन चक्रवर्तीऐवजी गोविंदाची वर्णी लागल्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले. मिका सिंग, हिमेश रेशमियाँसारखी नावे परीक्षणासोबतच त्यांच्या वादांमुळे टीव्हीवर लोकप्रिय होतात. रिअ‍ॅलिटी शो हा त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या ‘वैविध्यपूर्ण कौशल्यावर’ चालतो असा आत्तापर्यंतचा समज होता. मात्र सध्या स्पर्धक हे रिअ‍ॅलिटी शोमध्ये तोंडी लावण्यापुरतेच उरले आहेत की काय? अशी शंका वाटावी इतकं सेलिब्रिटी परीक्षकांचं प्रस्थ वाढत चाललं आहे. सेलिब्रिटीजना स्पर्धकांच्या सादरीकरणामधील किती कळतं यापेक्षा त्यांची माध्यमांमधली प्रतिमा, लोकप्रियता आणि त्यांच्यामुळे शोमध्ये होणारे वाद, रुसवेफुगवे यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. रिअ‍ॅलिटी शोच्या लोकप्रियतेसाठी स्पर्धकांपेक्षाही सेलिब्रिटीज कोण आहेत? परीक्षक म्हणून ते काय भूमिका घेतात? त्यांची प्रतिमा या गोष्टी महत्त्वाच्या ठरू लागल्या असल्याचे वाहिन्यांचे म्हणणे आहे. 

शो टीव्हीवर येण्याआधी चर्चेचे निमित्त
नृत्याचा कसलाही गंध नसलेला चेतन भगत संपूर्णपणे नृत्यावर आधारित कार्यक्रमामध्ये नक्की करणार काय? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सर्वानाच पडला होता. सध्याची पिढी हे प्रश्न मनात ठेवण्यापेक्षा सोशल मीडियातून लगेचच चर्चा, विनोद, टीकाटिप्पणीला सुरुवात करते. त्यामुळे निर्मात्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात शो टीव्हीवर येण्यापूर्वीच त्याबद्दलची अपेक्षित हवा तयार झाली. तीच गत आहे ‘इंडियन आयडल ज्युनिअर’च्या नव्या पर्वाची. यंदाच्या पर्वामध्ये सोनाक्षी सिन्हा परीक्षकाच्या भूमिकेत असल्याचे कळताच संगीतावर आधारित रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिची नक्की भूमिका काय? याबद्दल तर्कवितर्क करण्यात आले. ‘झलक..’चे नवे पर्व येण्यास अजून किमान दोन महिन्यांचा कालावधी आहे. पण त्यापूर्वीच माधुरी यंदा परीक्षक असेल की नाही? तिच्याऐवजी कोणत्या नायिकेला विचारणा झाली आहे, याबद्दलच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत. त्यामुळे शोबद्दल प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी सेलिब्रिटी परीक्षकांचा वापर केला जातो आहे, हे स्पष्ट दिसते.
सेलिब्रिटींची ‘प्रतिमा’ महत्त्वाची
कोणताही सेलिब्रिटी शोमध्ये घेऊन चालत नाही. त्याला स्वत:ची प्रतिमा असणे गरजेचे आहे, हे आतापर्यंत वाहिन्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे शोच्या प्रेक्षकांना तो सेलिब्रिटी आपलासा वाटला पाहिजे याची दक्षताही घेतली जाते. यावेळी त्यांची चित्रपटांमधील प्रतिमाही महत्त्वाची ठरत असल्याचे ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ शोचे निर्माते सचिन गोस्वामी सांगतात. ग्रामीण प्रेक्षकांना आपलासा वाटणारा मकरंद अनासपुरे यांचा चेहरा आणि शहरी प्रेक्षकांच्या परिचयाची रेणुका शहाणे यांची निवड करताना हेच निकष लावल्याचे ते सांगतात. ‘दबंग’, ‘रावडी राठोड’सारखे चित्रपट केलेली सोनाक्षी या नियमाला साजेशी बसते. चित्रपटांमधील सोज्वळ, ‘गर्ल नेक्स्ट डोर’ प्रतिमेमुळेच तिची वर्णी शोमध्ये लागल्याचे ‘सोनी टीव्ही’ वाहिनीचे बिझनेस हेड नचिकेत पंतवैद्य सांगतात.
शोमधील परीक्षकाला सादरीकरणाबाबत किती ज्ञान आहे, यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यामुळे शोकडे किती स्पर्धक वळवणे शक्य होईल, याचे गणित वाहिनीकडून आखले जाते. त्यासाठी शोच्या मांडणीत बदल करण्यासही वाहिनीची हरकत नसते. चेतनच्या परीक्षणावर प्रेक्षकांनीच प्रश्न उपस्थित करूनही शोची निर्माती एकता कपूर मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. ‘यंदा या शोमध्ये स्पर्धकांच्या नातेसंबंधांतील वेगवेगळे पैलू उलगडले जाणार आहेत. नृत्य हा त्यातून व्यक्त होण्याचे एक माध्यम असेल,’ असे तिने सांगितले होते. त्यामुळे सध्या तरुणाईमध्ये ‘नातेसंबंधांमध्ये तज्ज्ञ’ समजल्या जाणाऱ्या चेतन भगतची वर्णी शोमध्ये लागली. सोनाक्षीच्या निवडीबद्दल सांगताना ‘या शोसाठी आम्हाला एका अशा सेलिब्रिटीचा चेहरा हवा होता, ज्याला संगीतातील फारसे कळत नसेल, पण तो प्रेक्षकांचे प्रतिनिधित्व करू शकेल. त्यामुळे सोनाक्षीची निवड करण्यात आली,’ असे निर्मात्या अनुपमा मंडलोई सांगतात. सोनाक्षीच्या लोकप्रियतेचा शोसाठी वापर करून घेण्याचा हा वाहिनीचा प्रयत्न आहे यातून दिसून येतो.
स्पर्धकांना पुरून उरणारे परीक्षक
रिअ‍ॅलिटी शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या विविध तऱ्हांचे दर्शन टीव्हीवर होतेच. लहान मुलांच्या स्पर्धेमध्ये मुलांची निरागसता जपणे, काही शोमधील आगाऊ स्पर्धकांना चोख उत्तर देणेही गरजेचे असते. कित्येक रिअ‍ॅलिटी शोमध्ये टीव्हीवरील प्रस्थापित कलाकार स्पर्धक असतात, अशा वेळी परीक्षकही त्यांच्यापेक्षा अनुभवी असणे गरजेचे असते. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’मध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांमध्ये अनुभवी आणि नवोदित विनोदी कलाकारांचा समावेश होता. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला यांचे परीक्षण रुचेल असे चेहरे आपल्याला परीक्षक म्हणून हवे होते,’ असं गोस्वामी सांगतात. ‘एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये येणारे स्पर्धकसुद्धा ‘अरे ला कारे’ करणारे असतात. त्यामुळे शोचे परीक्षकही तितकेच रोखठोक बोलणारे आणि प्रसंगावधानी असणे गरजेचे असते. फराह खान, अनु मलिक, किरण खेर, मलाईका अरोरा खान, करण जोहर यांचे परीक्षण पाहात असताना या गोष्टीची जाणीव होते. ‘लहान मुलांची स्पर्धा मोठय़ांपेक्षा वेगळी असते, मुलांवर सरसकट टीका करून चालत नाही. त्यांच्या कलेने घेण्याची गरजही असते. शोसाठी तरुण परीक्षक निवडताना हीच बाब आम्ही लक्षात घेतली,’ असे मंडलोई सांगतात.
परीक्षकांचा एकमेकांमधील ताळमेळ महत्त्वाचा
मोठय़ा सेलिब्रिटींचे नखरेही मोठे असतात. त्यांना सांभाळणे हीदेखील एक मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शक्यतो ज्या कलाकारांचे एकमेकांसोबत पटते अशांचीच निवड करण्याकडे निर्मात्यांचा कल असतो. ‘झलक..’मध्ये आपल्याला स्पर्धा देण्यासाठी इतर अभिनेत्री नसावी, अशी अट माधुरीने वाहिनीला दिल्याचे सांगितले जाते. करण मलाईका आणि किरण खेर यांच्यात चाललेली थट्टामस्करी, विनोद, एकमेकांचे पाय खेचणे यामुळे शोचे वातावरणही हलकेफुलके राहते. ‘शान, सुनिधी, चौहान, मिका सिंग, हिमेश रेशमियाँ या चौघांची निवड परीक्षक म्हणून करताना त्यांनी या क्षेत्रामध्ये १० वर्षांहून अधिक काळ घालवला आहे आणि त्यामुळे ते चौघेही एकमेकांना तुल्यबळ आहेत,’ याकडे लक्ष दिल्याचे ‘द व्हॉइस’ शोच्या निर्माती संस्थेतील प्रिया भावे शर्मा सांगतात. त्यामुळे शोमधील स्पर्धा चालू असताना परीक्षकांमध्ये वेगळी स्पर्धा होणार नाही ना, याकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. एकूणच, रिअ‍ॅलिटी शोसाठी ‘सेलिब्रिटी परीक्षकां’चे प्रस्थ वाढतेच दिसून येत आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन