सिनेमाचा इतिहास सुरू होतो तेव्हापासून पणजोबा पृथ्वीराज कपूर यांचा उल्लेख केला जातो, त्यानंतर आजोबा राज कपूर आणि त्यानंतर आईवडिल, काका, बहिणी, अशी ज्याच्या कुटुंबाची नाळच सिनेमाशी जोडलेली आहे, त्या कपूर घराण्यातला आत्ताचा नायक रणबीर कपूर. पण, ‘सावरिया’ चित्रपटापासून सुरूवात करून अल्पावधीत उत्कृष्ट अभिनेता म्हणून नावलौकिक मिळवणारा रणबीर कपूर आपल्या यशाचे श्रेय केवळ आपल्या मेहनतीला देतो. बॉलिवुडमध्ये दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर घराणेशाही कामी येत नाही, असे मत रणबीरने व्यक्त केल़े
अभिनेता अनुपम खेर यांच्या ‘अ‍ॅक्टर प्रीपेअर्स’ या अभिनय प्रशिक्षण संस्थेत धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांशी रणबीरने संवाद साधला. बॉलिवुडमधली स्ट्रगल आपल्यालाही चुकली नाही, हे त्याने मान्य केले. किंबहुना, सुरुवातीच्या काळात घेतलेल्या कष्टांमुळेच आपल्याला आज यशाची फळे चाखायला मिळत आहेत, असे रणबीरने यावेळी सांगितले. यश मिळवण्यासाठी इंडस्ट्रीतील नावाजलेले कलाकार पडद्यामागे नेमकी कशा प्रकारे तयारी करत असतात, याचे अनुभव खुद्द त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी अनुपम खेर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एका खास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिली आहे. आज आपण इतक्या मोठय़ा भूमिका करत असलो तरी मुळात आपला स्वभाव हा लाजरा आणि संकोची असल्याचेही रणबीरने यावेळी सांगितले. पण, कॅमेऱ्यातून दिसणारा रणबीर तसा दिसत नाही, असा प्रश्न अनुपम खेर यांनी विचारताच ‘कॅमेऱ्यासमोर माझा लाजरा स्वभाव कुठे हरवून जातो कळत नाही’, असे त्याने सांगितले. ‘एकदा कॅमेरा रोल व्हायला लागला की आपण ही भूमिका करतो आहोत, हे आपले काम आहे अशी मनाची समजूत घालत मी हळूहळू भूमिकेत शिरतो. माझ्या लाजऱ्याबुजऱ्या स्वभावावर मात करण्याचा हा माझा नामी उपाय आहे’, अशी दिलखुलास कबुलीही रणबीरने देऊन टाकली.