अभिनय, गायन, नृत्य, गीतलेखन अशा वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी उत्साहाने सांभाळणारा अष्टपैलू अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तर पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी फरहानने दोनदा रिअ‍ॅलिटी शोजमधून सूत्रसंचालक आणि परीक्षक या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या असल्याने त्याला पुन्हा तिसऱ्यांदा याच विश्वात पाऊल टाकणे नवीन राहिलेले नाही. मात्र झी टीव्हीवर सुरू होणाऱ्या या नवीन ‘आय कॅ न डु दॅट’ या शोमधली त्याची सूत्रसंचालकाची भूमिका ही आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि काहीशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशी आहे.
फरहानने याआधी टीव्हीवर ‘ओय! इट्स फ्रायडे’ या टॉक शोचे सूत्रसंचालन केले होते. शिवाय, ‘नच बलिए’च्या पहिल्याच पर्वात परीक्षक म्हणून त्याने काम पाहिले होते. पण त्यानंतर बराच काळ चित्रपटांमध्ये रमलेला फरहान या शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोटय़ा पडद्याकडे वळला आहे. ‘आय कॅ न डु दॅट’ हा मूळचा आंतरराष्ट्रीय शो आहे. इस्रायलच्या ‘अ‍ॅरमोझा फ ॉर्मेट’ने मूळ शो विकसित केला होता. या शोला रशिया, चीन, स्पेन, ब्राझील आणि मेक्सिकोसारख्या देशात प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता या शोचा भारतीय अवतार त्याच नावाने ‘झी टीव्ही’ने आणला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील १२ सेलिब्रिटीज शोच्या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. यातला प्रत्येक सेलिब्रिटी हा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात पारंगत आहे. मात्र त्यांना त्यांच्या क्षेत्रातून बाहेर काढून त्यांना माहिती नसलेल्या, किंबहुना त्यांनी कधीही कल्पना केलेली नाही, प्रशिक्षण घेतलेले नाही अशा गोष्टी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे. सेलिब्रिटीजना या शोमध्ये कधी स्टंट करावे लागतील, तर कधी एखादे नृत्य बसवावे लागेल, जादूचे प्रयोग, आभासी खेळ अशा कित्येक गोष्टी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे आणि अशा वेळी सूत्रसंचालकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शोचा सूत्रसंचालक फरहान अख्तर हा एकाच वेळी या स्पर्धकांसाठी मित्र, मार्गदर्शक, त्यांना प्रेरणा देणारा त्यांचा हिरो अशा अनेक भूमिका पार पाडणार आहे. स्पर्धक आणि प्रेक्षकांना एकाच धाग्यात बांधून घेण्याची जबाबदारीही फरहानवर असणार आहे. नव्या पिढीला आवडतील, त्यांना उत्साहित करतील असे शोज ही आजची गरज आहे. झी टीव्हीने आत्तापर्यंत हे प्रयोग केले असल्याचे कौतुक फरहानने केले आहे. ‘आय कॅ न डु दॅट’ हा शो म्हणजे त्या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल आहे, असे फरहानला वाटते. हा शो प्रेरणा देणारा आहे, तुमच्यासमोर कुठलेही आव्हान आले तरी आत्मविश्वासाने, न घाबरता त्याला सामोरे जाणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच त्या आव्हानाची पूर्ती करण्यासाठी नेहमीच्या चौकटीपलीकडे जाऊन वेगळा विचार करणे कसोटीचे ठरणार आहे. मला स्वत:ला व्यक्तींमधले हे गुण खूप आवडतात. त्यामुळे हा शो प्रेक्षकांना बरेच काही देऊन जाईल, असा विश्वास फरहानने व्यक्त केला आहे.