महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या समस्या यांच्यातून मार्ग काढत त्यांना खंबीर बनवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ आणि ‘दूरदर्शन’ यांनी एकत्र येऊन ‘मैं कुछ भी कर सकती हूं’ या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेचे नवे पर्व ‘दूरदर्शन’वर परतले असून या वेळी त्याला बॉलीवूडचा आघाडीचा कलाकार फरहान अख्तर यानेही पाठिंबा दिला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ने भारतात केलेल्या सर्वेक्षणावरून अशा प्रकारच्या सामाजिक मालिकांना केवळ महिलाच नाही, तर पुरुष वर्गही मोठय़ा प्रमाणावर सहकार्य करीत असल्याचे दिसून आले आहे.
बालविवाह, लहान वयात मुलींवर लादलं जाणारं गर्भारपण आणि महिलांवर होणारे अत्याचार यावर यंदाच्या पर्वामध्ये चर्चा होणार आहे. ‘मर्द’ (मेन अगेन्स्ट रेप अ‍ॅण्ड डिस्क्रिमिनेशन) या आपल्या उपक्रमाच्या अंतर्गत अभिनेता फरहान अख्तर याने या कार्यक्रमाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. या वेळी बोलताना आपल्या समाजात रूढ असलेल्या स्त्री अत्याचाराला कारणीभूत ठरणाऱ्या विविध रूढी-परंपरांना नष्ट करण्यासाठी पुरुषांनी अधिक संवेदनशील बनण्याची गरज त्याने बोलून दाखविली. तसेच महिलांनी आपल्या ताकदीवर विश्वास ठेवल्यास त्या कोणतीही गोष्ट सहज मिळवू शकत असल्याचा विश्वासही त्याने या वेळी व्यक्त केला.
 या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये या मालिकेचे पहिले पर्व महिलांप्रमाणे पुरुषांच्या पसंतीसही उतरल्याचे दिसून आले आहे. कार्यक्रमादरम्यान देण्यात आलेल्या टोल फ्री नंबरवर ४८ टक्के फोन पुरुषांचे होते आणि तेथे त्यांनी आपली मते नोंदविली होती. तसेच बिहार, मध्य प्रदेशासारख्या भागामध्येही या मालिकेला ४२ टक्के प्रेक्षकवर्ग मिळाला होता.