बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खानला मोठे बनवणाऱ्या यशराजने त्यानंतर अनेक लहान-मोठय़ा कलाकारांना आपल्या बॅनरमधून संधी दिली. मात्र, यशराजचा चेहरा म्हणून शाहरूखला जी संधी मिळाली होती. तशी संधी यशराजचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राने कोणत्याही बॉलीवूड कलाकाराला दिली नव्हती. ‘खुबसूरत’ फेम अभिनेता फवाद खानशी यशराजने तीन चित्रपटांचा करार केला आहे. टेलिव्हिजनचे काही कलाकार सोडले तरी आपल्या बिग बजेट चित्रपटांसाठी यशराजने एवढा मोठा करार सध्याच्या काळात कुणाशीही केलेला नाही. त्यामुळे शाहरूखनंतर फवादलाच यशराजचा चेहरा म्हणून समोर आणायचा निर्णय आदित्य चोप्राने घेतला असल्याची कुजबुज चित्रपट वर्तुळात सुरू आहे. 

‘खुबसूरत’च्या यशानंतर पुन्हा मायदेशी पाकिस्तानात गेलेला फवाद खान सध्या पुन्हा भारतात आला आहे. सोनम कपूरबरोबरच्या आगामी ‘बॅटल ऑफ बिटोरा’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत आहे. करण जोहरच्या कपूर खानदानावर आधारित ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटात तो अलिया भट्टबरोबर काम करतो आहे. शिवाय, सोहैल खानच्या ‘माय पंजाबी निकाह’ या चित्रपटातही फवाद काम करत असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. मात्र, या तीन बिग बजेट चित्रपटांशिवाय तो यशराज बॅनरच्या चित्रपटाचा नायक होणार, अशी चर्चा गेले कित्येक दिवस सुरू होती. करीना कपूर-खानची मुख्य भूमिका असलेल्या यशराजच्या चित्रपटात फवाद खान नायक असणार, असे बोलले जात होते. खुद्द फवादने मात्र असा कुठलाही चित्रपट आपण करीनाबरोबर करत नसल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या काही वर्षांत यशराज प्रॉडक्शनने आपल्या चित्रपटांसाठी पहिल्यांदा आमिर, नंतर सलमान खान अशी स्वत:चीच चौकट मोडत अन्य कलाकारांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. पण, सिद्धार्थ शुक्ला हा टीव्ही कलाकार, कपिल शर्मा अशी मोजकी नावे वगळता यशराज बॅनरने एकाच वेळी तीन चित्रपटांचा करार कोणाशीही केलेला नाही. त्यामुळे यात फवाद खानचे नाव आघाडीवर असेल तर त्यालाच यशराजचा नवा चेहरा म्हणून समोर आणण्याचा मानस असावा, अशीच अटकळ बांधली जात आहे.

यशराज बॅनरचा करीनाबरोबरचा चित्रपट कोणता?, याची माहिती नसली. तरी यशराजने फवादशी तीन चित्रपटांचा करार केला आहे हे मात्र खरे आहे. फवादला याबद्दल विचारणा झाली असता थेट नकार दिलेला नाही. मात्र, तीन चित्रपटांच्या कराराबद्दलची अधिकृत घोषणा यशराज प्रॉडक्शनकडून होईल. तेव्हाच आपण त्यावर बोलू शकू, असे फवादने स्पष्ट केले आहे. तसे झालेच तर शाहरूख खाननंतर ‘यशराज’चा नायक म्हणून आघाडीच्या कलाकारांमध्ये फवाद खानचेच नाव घेतले जाईल.