‘केबीसी’चे सातवे पर्व सप्तकोटीपर्यंत पोहोचले असले तरीही स्पर्धकांची एक कोटीपर्यंत पोहोचतानाच दमछाक होते आहे. या पर्वातही ‘केबीसी’ला एकाच करोडपतीवर संतुष्ट राहावे लागणार असे वाटत असतानाच अखेरच्या काही भागांच्या चित्रिकरणात ‘केबीसी’ला या पर्वाची पहिली महिला करोडपती मिळाली आहे. उत्तरप्रदेशमधील फातिमा फिरोज या सातव्या पर्वातील पहिल्या महिला करोडपती ठरल्या आहेत.
आपल्याला हॉट सीटवर न बसताच घरी परत जावे लागणार असे वाटत होते. मात्र, अखेरच्या भागात ‘फास्टेस्ट फिंगर’ खेळून हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. जिंकलेल्या पैशातून घरासाठी घेतलेले कर्ज फेडायचे असून पुढे शिकायच आहे, अशी इच्छा व्यक्त केली. या पर्वातील अखेरच्या भागात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. ‘लल्लनभैया’ आणि खुद्द ‘अमिताभ बच्चन’ अशा दोन भूमिकांमध्ये अमिताभ यांनी अखेरच्या भागासाठीची रंगत साधली आहे.