गेल्यावर्षी २७ डिसेंबर रोजी बॉलीवूडने एक चांगला अभिनेता गमावला. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले ज्येष्ठ अभिनेते फारुख शेख यांचे गेल्यावर्षी दुबईत हृदयविकाराने अकस्मात निधन झाले होते.
वकिलीचे शिक्षण घेत असतानाच फारुख शेख यांनी नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गरम हवा’ या फाळणीवर आधारित चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच काळात हिंदी चित्रपटसृष्टीत येऊ घातलेल्या समांतर चित्रपटांच्या प्रवाहात ते सामील झाले व ७०-८०च्या दशकात अनेक समांतर चित्रपटांतून दर्जेदार भूमिका वठवल्या. ‘शतरंज के खिलाडी’, ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’ हे त्यांचे चित्रपट केवळ समीक्षकांच्याच नव्हे तर सामान्य प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरले. सत्यजित राय, श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले.